गेल्या आठवडय़ात दुहेरी आकडय़ातील किरकोळ महागाई दर जाहीर होत नाही तोच नव्या सप्ताहारंभी सव्वा वर्षांतील उच्चांकाचा घाऊक महागाई दर येऊन धडकला. यामुळे रिझव्र्ह बँकेमार्फत पुन्हा एकदा व्याजदर वाढीच्या शक्यतेला बळ मिळाले असून तसे झाल्यास गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्याकडून तिसऱ्यांदा कर्ज महागाईचा बडगा उगारला जाणार आहे. किमान पाव टक्के व्याजदर वाढीमुळे दर पुन्हा एप्रिल २०१२ च्या समकक्ष पोहोचणार असून राजन यांच्याद्वारे वाढीलाच कौल दिला जाईल.
कांदे, बटाटे यांच्यासह एकूण फळ तसेच अन्य भाज्यांचे दर वाढल्याने नोव्हेंबरमधील घाऊक किंमत निर्देशांक ७.५२ टक्के असा सप्टेंबर २०१२ नंतरचा सर्वोच्च राहिला आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये हा दर ७ टक्के होता. यंदा भाज्यांचे दर तब्बल ९५.२५ टक्क्य़ांनी वाढले आहेत. तर अन्नधान्याची दरवाढ १९.९३ टक्के अशी गेल्या चार वर्षांच्या वरच्या पातळीवर आहे. बटाटय़ाच्या किंमती २६.७१ टक्क्य़ांनी उंचावल्या आहेत. गेल्या आठवडय़ात किरकोळ महागाई दर ११.२४ टक्के असा दुहेरी आकडय़ात स्पष्ट झाला होता.
रिझव्र्ह बँकेचे मध्य तिमाही पतधोरण बुधवारी जाहिर होत आहे. डॉ. राजन यांनी ४ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती बँकेचा गव्हर्नर म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर यापूर्वी दोन वेळा प्रत्येकी पाव टक्का वाढ केली आहे. वाढत्या महागाईमुळे पुन्हा त्यात याच प्रमाणात वाढ झाल्यास नवा दर ८ टक्के असा होईल. हा दर एप्रिल २०१२ मध्ये होता. विशेष म्हणजे राजन यांचे पूर्वस्नेही डॉ. डी. सुब्बराव यांनी त्यांच्या गव्हर्नरपदाच्या कारकिर्दीत याचवेळी सलग तीन वेळा व्याजदर वाढ केल्यानंतर ती थांबविली होती. मेमध्ये हा दर ७.२५ टक्क्य़ांवर त्यांनी आणला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा