ग्रामीण भागाचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा या उद्देशाने डीएसके उद्योगसमूहाने विकसित केलेल्या ‘डीएसके मोबिलीज’ या उपकरणाचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. सौरऊर्जेवर चालणारे हे उपकरण टॅब्लेटसारखे सोपे आणि संगणकाइतकेच प्रभावी आहे.
या उपकरणाचा वापर करून बँकांचे प्रतिनिधी खेडय़ातील लोकांची खाती उघडू शकतील. त्याद्वारे ग्रामीण भागातील लोकांना ठेव योजना आणि आर्थिक व्यवहारांचा लाभ घेता येणार आहे. डॉ. माशेलकर म्हणाले, या उपकरणामुळे भारतही जागतिक दर्जाची आयटी उत्पादने आपण निर्माण करू शकतो, हे दाखवून दिले आहे. ही उपकरणे केवळ विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित नाहीत, तर संपूर्ण समाजाच्या फायद्याची असतात. डीएसके मोबिलीज हे खेडय़ातील बेरोजगारांचा हात बळकट करणारे उपकरण आहे. खेडय़ात केंद्र उभारून तेथील लोकांना संगणक साक्षर करणे शक्य होणार आहे. इंटरनेट शिकवून त्याद्वारे व्हॉईस व्हिडिओ आणि डाटा सेवा पुरवतील असा विश्वास आहे.
डीएसके उद्योगसमूहाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी म्हणाले, सौरऊर्जेवर चालणारे, हाताळण्यास सोपे, टॅब्लेटसारखे सुलभ आणि संगणकासारखे प्रभावी अशी सर्व आव्हाने पेलणारे हे उपकरण म्हणजे डिजिटल युगातील क्रांतीच आहे. अत्याधुनिक तंत्राचा समावेश करूनही या उपकरणाची किंमत सर्वाना परवडेल अशीच ठेवण्यात आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने डीएसके मोबिलीजने नगरमधील ५० हजारांहून अधिक लोकांच्या आयुष्यात चांगला आर्थिक बदल घडविला आहे.