सुधीर जोशी

आठवडय़ाची सुरुवात पुन्हा बाजारात खालचे सर्किट लागून झाली व एकाच दिवशी बाजार १३ टक्क्य़ांनी घसरला. सर्वाधिक अस्थिरतेच्या वातावरणात बाजाराने पाडव्याला दशकातील सर्वोत्तम एक दिवसीय उसळी घेऊन नववर्षांचा शुभमुहूर्त केला व उर्वरित दिवसात झालेल्या घसरणीची काही प्रमाणात भरपाई झाली. सात आठवडय़ाची परंपरा राखत सेन्सेक्सने १०० अंशांची तर निफ्टी निर्देशांकाने ८५ अंशांची साप्ताहिक घसरण नोंदविली.

अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या उपाययोजनांचा कल गरीब व हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या खिशात थोडे पैसे घालण्याकडे तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची कमी किंमतीत उपलब्धता करून देण्याकडे आहे. जेणेकरून त्यांना या कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यास मदत होईल आणि एकंदरीत वस्तूंच्या मागणीवरही त्याचा परिणाम होऊन उद्योगांना अप्रत्यक्ष फायदा होईल.

पाठोपाठ करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीने रेपो दरात पाऊण टक्कय़ांची तर रोख राखीव प्रमाणात एका टक्क्य़ाची कपात केल्याने १.७५ लाख कोटी रुपये अर्थव्यवस्थेत उपलब्ध होतील. सध्याच्या परिस्थितीचे नीट आकलन केले तर चौथ्या तिमाहीच्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर ४ टक्क्य़ांच्या खाली घसरेल. महागाई दर सध्या ६ टक्कय़ांपेक्षा अधिक असला तरी मागणीअभावी किंमतीत घसरण झाल्याने महागाई दर मार्च-एप्रिल महिन्यात ४ टक्कय़ांच्या आत असेल.

संपूर्ण जग अशा एका कालखंडातून जात आहे ज्याचा पूर्वानुभव कुणालाच नाही. आपली संपत्ती जपायची का जीव जपायचा हाच खरा प्रश्न आहे. संकटे येतात व जातात; पण मानवी जीवन पुढे सुरूच राहते. या संकटसमयी आपले मनोधैर्य टिकवून ठेवणे जेवढे महत्त्वाचे तितकेच महत्व पुढील काळात आपली संपत्ती कशी वाढेल हे पाहायला आहे. या काळात जर आपण आपल्या समभागातील गुंतवणूक कशी कमी होत आहे हेच रोज पाहिले तर नैराश्य येईल आणि समभागातील गुंतवणुकीवरचा विश्वासच उडून जाईल. समभागातील गुंतवणुकीत जोखीम ही असतेच. पण बाजाराच्या निर्देशांकाच्या गेल्या ३० वर्षांतील आलेखाकडे पाहिले तर प्रत्येक उतरणीनंतर निर्देशांक उसळी घेतातच. त्यामुळे या काळात एकीकडे समभागातील गुंतवणुकीत टप्प्याटप्प्याने वाढ करून भविष्यातील संपत्तीचा पाया तयार करायचा आणि दुसरीकडे आपले दर महिन्याला मिळणारे वेतन / निवृत्ती वेतन, बँकेतील ठेवी अथवा रोख्यांमधील गुंतवणुकीतील वाढ किंवा त्यामधून मिळणारे व्याज यामुळे या संकट काळात कशी तग धरू शकलो याबद्दल स्वत:लाच शाबासकी द्यायची! कुठलाही आर्थिक सल्लागार  गुंतवणुकीतील विविधता राखण्याचा सल्ला यासाठीच देत असतो.

सप्ताहातील उसळीमुळे खालच्या पातळीवर खरेदी करण्यास सरसावलेल्या गुंतवणूकदारांना खरेदीची संधी हातातून निसटली की काय अशी धास्ती वाटू लागली आहे. परंतु अशी संधी येईल. अर्थमंत्र्यांकडून सध्याच्या परिस्थितीबाबत आर्थिक उपाययोजना तसेच रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदरांमधील अपेक्षित कपात जाहीर झाली आहे. बाजाराचे लक्ष आता कोविड-१९ विषाणूचा मुकाबला कसा व किती लवकर होणार याकडे आहे. बाजाराचे निर्देशांक त्यांनी नुकतीच दाखवलेली किमान पातळी परत एकदा गाठण्याचा प्रयत्न करतील. त्या वाटचालीमध्ये या आठवडय़ात वर गेल्यामुळे हातातून निसटलेले समभाग पुन्हा एकदा खरेदी करता येतील.

sudhirjoshi23@gmail.com

Story img Loader