आयपीएलचे दोन संघ विकत घेण्यासाठी हीरो मोटोकॉर्प व जेएसडब्ल्यू यांच्यात चढाओढ लागली असतानाच आता ई कॉमर्समधील फ्लिपकार्ट, स्नॅपडील व पेटीएम या कंपन्यांच्याही सध्या सुरू लिलावात नवीन क्रिकेट संघ विकत घेण्याकडे नजरा वळल्या आहेत.
आयपीएल क्रिकेटमधील भ्रष्टाचार उघडकीला आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीने चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स या संघांना दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे. या दोन्ही संघांनी बेकायदा बेटिंग केले होते व त्यांचे मालकही बेकादेशीर सट्टेबाजीत उतरल्याचा आरोप होता.
संघ मिळवण्यासाठी प्रयत्नशील जिंदाल यांच्या ११ अब्ज रुपयांचा जेएसडब्ल्यू समूहाने, थोडी स्थिती स्पष्ट झाल्यानंतर त्यांचे डावपेच खेळले जातील असे स्पष्ट केले आहे. हीरोकॉर्पने आयपीएल संघ विकत घेण्याबाबत अधिकृतपणे काही सांगितले नसले तरी त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत. ई-कॉमर्समधील गुंतवणूक वाढत चालली असताना सध्या एखादा संघ विकत घेणे आवश्यक आहे, असे पेटीएमचे उपाध्यक्ष शंकर नाथ यांनी सांगितले. आयपीएलमुळे नाव नसलेल्या खेळांडूना बाजारात संधी मिळते तसेच ब्रँडही तयार होते. काही बाबी स्पष्ट झाल्यानंतर आम्ही आयपीएलच्या लिलावात भाग घेऊ, असे ते म्हणाले.
अ‍ॅमॅझॉन इंडिया, फ्लिपकार्ट व स्नॅपडील यांचाही असाच कल दिसून येतो. आयपीएलच्या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आताच्या परिस्थितीत पैसा हा प्रश्न नसताना ऑनलाईन रिटेलसाठी मोठा वाव आहे. त्याचबरोबर त्यांनी आयपीएल संघ विकत घेतला तर मोठा फरक पडेल.
स्वस्तात संघ मिळत असेल तर आम्ही या संधीचा जरूर विचार करू ,असे एका ऑनलाईन बाजार कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेता सांगितले.

Story img Loader