पंधरवडय़ावर येऊन ठेपलेल्या सणोत्सवाच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध केले जावे यासाठी सरकारची बँकांच्या प्रमुखांबरोबर बोलणी सुरू असून, ग्राहकांना मिळू घातलेल्या या नजराण्याचे प्रारूप लवकरच पुढे आणले जाईल, असे रिझव्र्ह बँकेचे गव्र्हनर रघुराम राजन यांनी शुक्रवारी येथे बोलताना स्पष्ट केले.रिझव्र्ह बँकेच्या संचालक मंडळाची येथे आयोजित तिमाही बैठक संपल्यानंतर डॉ. राजन पत्रकारांशी बोलत होते.केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांची अर्थव्यवस्थेला मंदीच्या खाईतून वर आणण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून सणासुदीत दुचाकी आणि अन्य ग्राहकोपयोगी वस्तू व उपकरणांना मागणी वाढेल, असे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून अर्थसंकल्पात वचन दिल्याप्रमाणे बँकांमध्ये १४,००० कोटी रुपयांचे अतिरिक्त भांडवलही ओतले जाणार आहे.
जालान समितीत आणखी तीन सदस्य
रिझव्र्ह बँकेने शुक्रवारी नवीन बँक परवान्यांच्या मूल्यमापनासाठी माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या नेतृत्वाखालील समितीत तीन सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा करताना, येत्या जानेवारीपर्यंत याबाबत निर्णय घेतला जाण्याचे संकेत दिले.
डॉ. बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, सेबीचे माजी अध्यक्ष सी. बी. भावे आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून नचिकेत मोर यांची नियुक्ती करण्यात येत असून, जानेवारी २०१४ पर्यंत या समितीकडून निर्णय येईल, असे शक्य ते प्रयत्न असल्याचे गव्हर्नर राजन यांनी सांगितले.
या समितीकडून येणाऱ्या शिफारशींवर गव्हर्नर व डेप्युटी गव्हर्नर विचारविमर्श करून अंतिम निर्णय घेतील. रिझव्र्ह बँकेचे वरिष्ठ डेप्युटी गव्हर्नर आनंद सिन्हा यांच्या अधिपत्याखालीच नवीन बँक परवाने अदा करण्यासाठी प्रस्ताव ते अर्ज मागविण्याची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे जानेवारी २०१४ मध्ये त्यांच्या नियोजित निवृत्तीपूर्वी प्रत्यक्षात नव्या बँका कोण असतील, याचाही निकाल लागावा असा आपला प्रयत्न असल्याचे राजन यांनी पत्रकारांना सांगितले.
रिझव्र्ह बँकेकडे एकूण २६ बँक परवाने इच्छुकांकडून अर्ज सादर झाले असून, त्यात टाटा सन्स, उद्योगपती अनिल अंबानी, कुमार मंगलम बिर्ला या बडय़ा औद्योगिक घराण्यांनीही आपल्या उपकंपन्यांमार्फत स्वारस्य दाखविले आहे.
गेल्या महिन्यात गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारताच नवीन परवान्यांबाबतचा निर्णय निर्णय लवकर तडीस नेण्यासाठी डॉ. राजन प्रयत्नशील आहेत. रिझव्र्ह बँकेच्या मुख्यालयात त्यांनी केवळ याच कामासाठी २० कर्मचाऱ्यांचा एक चमूही तयार केला आहे.
नुसत्या घोषणेने भाव खाल्ला!
सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे होणारे भांडवलीकरण आणि त्या परिणामी वित्तपुरवठय़ात सुधारासह स्वस्त दरातील कर्जे वितरीत करण्याचा बँकांच्या मानसाने शेअर बाजारात वाहन उद्योग आणि ग्राहकोपयोगी कंपन्यांच्या समभागांवर गुंतवणुकदारांच्या उडय़ा पडताना दिसल्या. अनेक बडय़ा वाहन निर्मात्या कंपन्यांचे समभाग खरेदीमुळे लक्षणीय वधारले. दुचाकी क्षेत्रातील टीव्हीएस मोटरचा समभाग ८ टक्क्य़ांनी उसळला, त्या खालोखाल टाटा मोटर्स (५.७७%), महिंद्र अॅण्ड महिंद्र (२.३२%), बजाज ऑटो (१.५७%), हीरो मोटोकॉर्प (१.५५%) आणि मारुती सुझूकी (१.२६%) अशा वाहन क्षेत्रातील सर्वच समभागांबाबत सकारात्मकता दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक गुरुवारच्या तुलनेत फारशी कमाई न करता, आहे त्याच स्तरावर शुक्रवारी स्थिरावले. तथापि, ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील बजाज इलेक्ट्रिकल्स (५.९१%), पीसी ज्वेलर्स (५%), व्हर्लपूल (३.३६%) आणि राजेश एक्स्पोर्ट (२.४७%) हे समभाग बँकांकडून अनुकूलता दिसल्यास दिवाळीत ग्राहकांकडून चांगली खरेदी होईल या अपेक्षेने भाव खाऊन गेले.
ग्राहकांसाठी रिझव्र्ह बँकेचा ‘दिवाळी बोनस’ लवकरच!
पंधरवडय़ावर येऊन ठेपलेल्या सणोत्सवाच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध केले जावे यासाठी सरकारची बँकांच्या प्रमुखांबरोबर बोलणी सुरू
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-10-2013 at 12:51 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Early diwali state run banks to get funds from government to provide cheaper loans