निर्मिती क्षेत्र आणि कृषी क्षेत्र या अर्थव्यवस्थेच्या दोन प्रमुख स्तंभाच्या मंदावलेल्या गतीचे दृश्य प्रत्यंतर म्हणजे जुलै ते सप्टेंबर या विद्यमान २०१२-१३ आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक विकासदर केवळ ५.३ टक्के नोंदविला गेला.  गेल्या वर्षी याच तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या वाढीचा ६.७ टक्के अशा दमदार वेगाने प्रवास सुरू होता. त्या तुलनेत यंदाचा विकासदर कमालीचा घसरला आहेच, पण चालू वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील ५.५ टक्के दरापेक्षा तो खाली आला आहे.
ऐन हंगामातील पावसाची ओढ आणि निर्मिती क्षेत्राची खराब कामगिरी यामुळेच सरलेल्या तिमाहीत केवळ ५.३ टक्क्यांचा आर्थिक विकास साधता आला आणि तो आपल्या अपेक्षपेक्षा कमालीचा खाली असल्याची हताश प्रतिक्रिया अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी व्यक्त केली. ३० सप्टेंबर २०१२ अखेपर्यंतच्या तीन महिन्यात कृषी क्षेत्राच्या उत्पादनात अवघी १.२ टक्क्यांची वाढ झाली, जी गेल्या वर्षी याच कालावधीत ३.१ टक्के अशी होती.
शेती आणि शेतीपूरक क्षेत्राचा मंदावलेला उत्पादन दर हा प्रामुख्याने सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे आणि प्रामुख्याने जून-जुलै या प्रारंभीच्या महिन्यात पावसाच्या ओढीपायीच आहे. परिणामी खरीपाच्या पिकांमध्ये झालेल्या घसरणीने एकूण आर्थिक विकासदरावर विपरीत परिणाम साधला आहे, असे चिदम्बरम यांनी सांगितले.
उद्योगक्षेत्राच्या वाढीला लागलेले ग्रहण हे प्रामुख्याने सरलेल्या तिमाहीत केवळ ०.८ टक्के वाढ दर्शविणाऱ्या निर्मिती क्षेत्रामुळेच आहे याकडे चिदम्बरम यांनी लक्ष वेधले. गेल्या वर्षी मात्र याच तिमाहीत निर्मिती क्षेत्र २.९ टक्के दराने वाढले होते. त्याचवेळी गेल्या वर्षांच्या ९.९ टक्के दराच्या तुलनेत, विमा व स्थावर मालमत्तासहित संपूर्ण सेवाक्षेत्राने चालू वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत ९.४ टक्क्यांचा विकासदर नोंदविला. तथापि पहिल्या तिमाहीच्या तुलनेत सेवाक्षेत्राने आश्वासक सुधार दर्शविला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.एकूणात २०१२-१३ आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांचा (एप्रिल ते सप्टेंबर) आर्थिक विकासदर ५.४ टक्के नोंदविला गेला आहे, जो वर्षभरापूर्वी याच सहामाहीसाठी ७.३ टक्के असा होता.      
   
रिझव्‍‌र्ह बँकेच्या डिसेंबरमधील मध्य-तिमाही आढाव्याचा कल हा सर्वथा नोव्हेंबरमधील महागाई दराच्या आकडय़ांवर बेतलेले असेल. परंतु जानेवारी २०१३ च्या आढाव्यात मात्र रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदरात कपात अपेक्षित आहे.
– दीपाली भार्गव
मुख्य अर्थतज्ज्ञ, इस्पिरिटो सॅन्टो सिक्युरिटी

Story img Loader