मालेमधील आधीच्या सरकारने रद्द केलेला जीएमआर कंपनीचा विमानतळ बांधणीचा कंत्राट तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. मालदीवमधील नव्या सरकारचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी याबाबतचे संकेत भारत दौऱ्यात दिले. यामीन यांनी गुरुवारी नवी दिल्लीत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी अनेक उद्योगपतींशी चर्चा केली. माले आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधणीबाबतचे जीएमआर या कंपनीचे रद्द झालेल्या कंत्राटाबाबत न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याचे आश्वासन यामीन यांनी दिले. जीएमआरचे प्रकरण राजकीयदृष्टय़ा हाताळले गेले असे मत व्यक्त करत यामीन यांनी जीएमआरसारखी कंपनी आपल्या देशात असावी, अशी इच्छा व्यक्त केली. चर्चेतून कोणतीही गोष्ट सुटू शकते, असे नमूद करून याबाबत कंपनीशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

परदेशगमन परवानगीसाठी  रॉय पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
नवी दिल्ली : सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांनी आपल्याला भारताबाहेर जाऊ देण्याची परवानगी मागण्यासाठी गुरुवारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. सेबीला २० हजार कोटी रुपये परत करण्यास अपयश आलेल्या रॉय यांनी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर जाणे महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने याबाबतची सुनावणी आता पुढील गुरुवारी ठेवली आहे. समूहातील गृहनिर्माण कंपन्यांमार्फत गुंतवणूकदारांचे पैसे परस्पर हस्तांतरित केल्याप्रकरणात भांडवली बाजार नियामक सेबीने कारवाई केल्यानंतर २० हजार कोटी रुपये परत करण्याचे आदेश सहाराला सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याच प्रकरणात रॉय यांना तूर्त भारताबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याबाबत रॉय यांचे वकील सी. ए. सुंदरम यांनी आपल्या अशिलाला व्यवसायानिमित्त देशाबाहेर जाऊ देण्यास परवानगी मागितली. ते तीन दिवसांत परत येतील, असेही सुंदरम न्यायालयात म्हणाले. के. एस. राधाकृष्णन व जे. एस. शेखर यांच्या खंडपीठाने यावर येत्या ९ जानेवारीला सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले.

Story img Loader