बेळगाव येथील ‘लोकमान्य’ संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘लोकमान्य मातृभूमी पुरस्कारा’साठी माजी खासदार आणि सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. पाच लाख ५१ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार २०१२ या वर्षांचा आहे.  
येत्या १ सप्टेंबर रोजी बेळगाव येथील ज्ञान प्रबोधन मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते ठाकूर यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप, ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. युनायटेड वेस्टर्न बॅंकेचे माजी अध्यक्ष पी. एन. जोशी व ‘जडण-घडण’मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे हे ठाकूर यांच्याविषयीचे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.
२०१० या वर्षांपासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पहिला पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना, तर २०११ या वर्षांचा दुसरा पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना देण्यात आला होता.