बारा आकडी आधार क्रमांकाची नोंद करून बँकेत खाते उघडण्यासाठी हाताचे पंजे अथवा डोळे याद्वारे ग्राहकाची ओळख पटविली जाण्याऐवजी आता केवळ खातेदाराचा मोबाइल क्रमांक अथवा ई-मेल हीच त्याची ओळख असे बँकिंग व्यवहाराचे सोपे व झटपट संक्रमण लवकरच होऊ घातले आहे.
बँकेत बचत अथवा कर्ज खाते सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्ररहित ई-केवायसी यंत्रणेचा शुभारंभ अॅक्सिस बँकेच्या रूपाने प्रथमच भारतीय बँकिंग क्षेत्रात करताना भारतीय विशेष ओळखपत्र प्राधिकरणाचे (यूआयडीएआय) अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी या नव्या बदलांची घोषणा केली.
बँकेतील व्यवहारासाठी केवायसी अर्थात ‘ग्राहक जाणून घ्या’ पद्धती रिझव्र्ह बँकेने बंधनकारक केली आहे. खातेदाराची संपूर्ण माहिती, निवासी पत्ता, संपर्क माध्यम आदीसाठी कागदरहित प्रक्रिया म्हणजेच ई-केवायसीही लागू करण्याचे आदेशही गेल्याच महिन्यात देण्यात आले. ई-केवायसीसाठी संगणकीकृत स्वाक्षरीही (डिजिटल सिग्नेचर) गृहीत धरली जाते. मात्र ‘आधार’च्या व्यासपीठावर हे सर्व टाळणाऱ्या ई-केवायसी यंत्रणेचा पहिला उपयोग खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेत व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अध्यक्षा शिखा शर्मा यांनी निलेकणी यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईत केला.
निलेकणी यांनी या वेळी सांगितले की, ई-केवायसीच्या व्यासपीठावर ‘आधार’द्वारे नवे खाते उघडण्यासाठी संबंधित ग्राहकाच्या हाताच्या पंजांचे ठसे अथवा डोळ्यांची प्रतिमा नोंदविली जाते. मात्र यानंतर संबंधित खातेदाराचा मोबाइल क्रमांक अथवा ई-मेल हे एकवेळचा पासवर्ड (ओटीपी) नोंदवून ई-केवायसीच्याच माध्यमातून नवे खाते उघडण्याची सुविधा लवकरच केली जाईल.
ई-केवायसीसाठी व्हिसा हे प्राधिकरण व अॅक्सिस बँक यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणार असून सध्या बँकेच्या १,००० शाखांमध्ये असलेली ही सुविधा चालू महिनाअखेर २,००० शाखांमध्येही सुरू केली जाणार आहे. देशातील तिसऱ्या मोठय़ा या खासगी बँकेच्या २,२२५ शाखा आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा