गेल्या सलग तीन व्यवहारात ऐतिहासिक उंचीवर विराजमान असणाऱ्या बाजाराला शुक्रवारी मात्र कमी मान्सूनच्या भाकितांनी खाली खेचले. जवळपास द्विशतकी घसरणीसह सेन्सेक्स सप्ताहअखेर २२,७०० वर येऊन ठेपला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ५८.०५ अंश घट होऊन तो ६७८२.७५ पर्यंत खाली आला.
यंदाच्या मोसमात पाऊस सरासरीच्या तुलनेत ९५ टक्केच राहण्याबाबत वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजाने भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी समभागांची जोरदार विक्री केली. असे करताना त्यांनी पाऊस, कृषिक्षेत्राशी निगडित निर्देशांकामध्ये घसरणीचे व्यवहार नोंदविले. आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभागमूल्य घसरले. त्यांच्यात अनुक्रमे २.७६ व २.५८ टक्के घट नोंदविली गेली.
सोमवार ते बुधवार अशी चालू आठवडय़ातील पहिल्या तीनही दिवशी सेन्सेक्सने विक्रमी वाटचाल राखली आहे. बुधवारच्या २२,८७६.५४ या शिखरानंतर गुरुवारी बाजारात व्यवहार झाले नाहीत. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात २२,९३९.३१ पर्यंत तेजी नोंदविल्यानंतर सेन्सेक्सने २३ हजाराच्या उंबरठय़ावरून मोठी फारकत घेतली. मध्यंतरीच्या सत्रात निफ्टीदेखील ६८६९.८५ वर झेपावला होता.
गेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत आकर्षक वित्तीय निष्कर्ष नोंदवूनही आयसीआयसीआय बँक व मारुती सुझुकीच्या समभागांना भांडवली बाजारात निराशाजनक कामगिरी नोंदवावी लागली. दोन्ही कंपन्यांचे समभाग अनुक्रमे २.२९ व १.३५ टक्क्य़ांनी आपटले. सेन्सेक्समधील २१ समभाग घसरले. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तेल व वायू सर्वाधिक २.११ टक्क्य़ांनी रोडावला.
*रुपया मात्र बळावला!
सलग तीन व्यवहारातील घसरणीनंतर रुपया शुक्रवारी भक्कम बनला. डॉलरच्या तुलनेत तब्बल ४७ पैशांनी वधारत भारतीय चलन थेट ६०.६० वर जाऊन पोहोचले. सप्ताहअखेरच्या व्यवहारात रुपयाचा प्रवास ६१.१५ ते ६०.५४ असा अनुक्रमे नीचांकी ते उच्चांकी राहिला. व्यवहाराच्या तीनही सत्रात विक्रमी टप्प्यावर पोहोचलेल्या भांडवली बाजारात निधी ओतण्यासाठी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून अमेरिकी डॉलरला मागणी येऊनही रुपया मात्र आश्चर्यकारकरीत्या कमकुवत बनत गेला होता.  गेल्या तीन सत्रात रुपया तब्बल ७८ पैशांनी आपटला होता.
*सोने ३० हजारांपुढे!
मौल्यवान धातूंमध्ये पुन्हा भाव चढलेले पाहायला मिळत आहे. मुंबई सोन्याचे दर ३० हजाराचा पल्ला गाठते झाले. मुंबई सराफा बाजारात स्टॅण्डर्ड सोने तोळ्यासाठी एकदम २०७ रुपयांनी वधारत ३०,०६५ रुपयांवर गेले. तर १० ग्रॅमच्या शुद्ध सोन्याचा भावदेखील ३०,२१५ रुपयांपर्यंत जाऊन भिडला. सोबतच चांदीचे भावही ४४ हजारापर्यंत पोहोचले आहेत. शुक्रवारी किलोच्या चांदीचा दर १४० रुपयांनी वधारत ४३,९०५ रुपयांवर गेला. मतदानामुळे सराफा बाजारात गुरुवारी व्यवहार झाले नव्हते.

Story img Loader