पीटीआय, नवी दिल्ली : जगभरातील उदयोन्मुख अर्थव्यवस्था असणारे देश डॉलरच्या तुलनेत स्वदेशी चलन सावरण्यासाठी परकीय गंगाजळी लक्षणीय स्वरूपात खर्च करत आहेत, परिणामी भारत, चीन आणि इंडोनेशियासह इतर देशांना परकीय चलन गंगाजळी घसरणीचा सामाना करावा लागत असून, हे प्रमाण भारताच्या बाबतीत सर्वाधिक आहे. देशाच्या परकीय चलन गंगाजळीत घसरण कायम असून १५ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवडय़ाच्या अवधीत गंगाजळी ४.५ अब्ज डॉलरने आटत ५२८.३७ अब्ज डॉलरखाली उतरली आहे.

रशिया-युक्रेन युद्ध आणि त्यानंतर जगभरात असलेल्या महागाईच्या आगडोंबामुळे जगभरातील वस्तू आणि सेवा महागल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर कित्येक महिने पिंपामागे १०० डॉलरच्या पातळीवर कायम होते. परिणामी आयात खर्चातदेखील वाढ झाली आहे. याच प्रतिकूलतेपायी डॉलरच्या तुलनेत घसरलेल्या रुपयाला सावरण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने आतापर्यंत ५३ अब्ज डॉलरहून खर्ची केले आहेत. परिणामी भारताचा परदेशी चलन साठा सर्व उभरत्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सर्वाधिक घटला आहे. एका अहवालानुसार, वर्ष २०२२ च्या सुरुवातीपासून भारताची परकीय गंगाजळी ६३३.६ अब्ज डॉलरवरून कमी होत, ५२८ अब्ज डॉलपर्यंत खाली आली आहे. ती चालू वर्षांत १४ टक्क्यांहून अधिक घसरली आहे. भारतानंतर, रशियाचा परकीय चलनसाठा १० टक्क्यांहून अधिक घसरला आहे, त्यानंतर इंडोनेशियाचा ९.१९ टक्क्यांनी घसरला आहे. दुसरीकडे, तैवानची परकीय गंगाजळी सर्वात कमी म्हणजे केवळ ०.५३ टक्क्यांनी घसरली.

लाख कोटी डॉलरची घसरण

भारतासह युरोपातील झेक प्रजासत्ताकसारख्या लहान देशांच्या मध्यवर्ती बँकांनी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत त्यांच्या चलनांना सावरण्यासाठी परकीय चलन बाजारात हस्तक्षेप केल्यामुळे बहुतांश देशांच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये जलद गतीने घसरण सुरू आहे. जागतिक पातळीवर परकीय चलन गंगाजळीमध्ये एकंदर सुमारे १ लाख कोटी डॉलर म्हणजेच ७.८ टक्क्यांची घसरण झाली आहे. ती आता घसरून १२ लाख कोटी डॉलपर्यंत खाली आली आहे. ब्लूमबर्गने २००३ मध्ये या संबंधाने माहिती संकलित करण्यास सुरुवात केल्यापासूनची ही सर्वात मोठी घसरण आहे.

Story img Loader