अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज घरकुलाच्या खरेदीसाठी मंडळींसाठी उपयुक्त अशी अनोखी गृह-योजना ठाण्यात साकारण्यात आली आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील प्रथितयश रुस्तमजीने ठाण्यात आपल्या ‘अर्बनिया’ संकुलासाठी योजलेली ही क्लृप्ती म्हणजे सध्याच्या मलूल आर्थिक वातावरणात मागणी रोडावल्याचे चटके सोसत असलेल्या बांधकाम व्यावसायिकांसाठी एक नि:श्वास ठरेल.
रुस्तमजीने ‘अर्बनिया’मध्ये घर खरेदीसाठी ‘२०/८०’ नावाची योजना सुरू केली आहे. ज्यायोगे ग्राहकांकडून घेतलेल्या गृहकर्जाचे पहिल्या दोन वर्षांत कोणतेही हप्ते भरावे लागणार नाहीत. विकसक कंपनी रुस्तमजीकडून हे दायित्व स्वीकारले जाईल. निम्न व मध्यम उत्पन्न स्तरातील घर-इच्छुकांसाठी ही मोठीच बचत ठरेल, असे अर्बनिया टाऊनशिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कपूर यांनी सांगितले.
ठाण्यातील माजिवडा जंक्शननजीकच्या १२७ एकर क्षेत्रावर फैलावलेल्या या गृहसंकुलातील ४० इमारतीत एकूण ४,००० हून अधिक सदनिका विकसित होत आहेत. या इतक्या मोठय़ा प्रमाणावर साकारत असलेल्या गृहयोजनेत अशा प्रकारे सवलत देणारी या धर्तीची ही पहिलीच योजना असल्याचा दावा कपूर यांनी केला. इतकेच नव्हे ‘२०/८०’ योजनेत ग्राहकांना बुकिंगसमयी घराच्या किमतीच्या केवळ २० टक्के रक्कम भरावयाची असून, उर्वरित ८० टक्के मूल्याची कर्जसुविधा आयसीआयसीआय बँकेकडून मिळविण्याची सोय रुस्तमजीनेच केली आहे. या गृहकर्जावर प्रारंभीच्या दोन वर्षे काहीही मासिक हप्ता ग्राहकाला भरावा लागणार नाही, असेही कपूर यांनी स्पष्ट केले. विशेषत: घरांसाठी इच्छुक ग्राहकांमध्ये विस्तृत सर्वेक्षणानंतर या योजनेला आकार देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
एकाच आवारात सर्व आधुनिक सुविधा, सुसज्ज शाळा, तसेच होम ऑटोमेशन, फर्निशिंग व अन्य मूलभूत सुविधांनी युक्त येथील २ बीएचके सदनिकेसाठी ९,३५० रुपये प्रति चौरस फूट असा दर निश्चित करण्यात आला आहे, अशी त्यांनी माहिती दिली. जून २०१६ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास जाऊन लोकांना सदनिकेचा ताबा दिला जाणार आहे.
तिशी-चाळीशीतील ७५ टक्के लोक नव्या घराच्या शोधात आहेत. यातील जवळपास ७० टक्के हे पगारदार आहेत. घरांच्या किमती जरी वाढल्या असल्या तरी गृहकर्ज आजही त्यांच्यासाठी मदतकारक पर्याय आहे. पण घराचा ताबा मिळण्यापूर्वीच त्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्तेही आणि सध्याच्या निवासाचे भाडेही भरणे त्यांच्यासाठी आर्थिक आफतच ठरते. बँकांच्या गृहकर्जात प्रारंभीच्या हप्त्यांमध्ये व्याजाचा हिस्सा खूप मोठा असतो. त्याचा सर्व भार खुद्द बांधकाम विकसकांकडून उचलला जाणे, ही पगारदार वर्गाचा मोठा आर्थिक ताण हलका करणारी बाब ठरते.
’ अभिषेक कपूर
मुख्य कार्यकारी अधिकारी
अर्बनिया टाऊनशिप, रुस्तमजी