रोजगाराच्या संधी पूर्वपदावर..

मुंबई : करोना टाळेबंदीतील शिथिलतेसह बहुतांश व्यवसायांवरील प्रतिबंध दूर झाल्याचा सुपरिणाम आता रोजगारावर दिसू लागला आहे. नवीन नोकर भरतीने वेग पकडला असून, सरलेल्या ऑगस्ट महिन्यात वार्षिक आधारावर २६ टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑगस्टच्या संपूर्ण महिन्यात २.७८ लाख लोकांना नवीन रोजगार संधी मिळाल्या आहेत.

बेंगळूरु येथील एक्सफेनो या नोकरभरती साहाय्यक कंपनीकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात झालेल्या नोकरभरतीमध्ये पूर्ण वेळ नोकऱ्यांचे प्रमाण ९४ टक्के राहिले आहे आणि ही अत्यंत जमेची बाब आहे. गेल्यावर्षी जून-जुलैनंतर वार्षिक आधारावर ऑगस्ट २०२० पासून नोकरीच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. जून-जुलै २०२० मध्ये अनुक्रमे १.३२ लाख आणि १.४२ लाख रोजगार संधी निर्माण झाल्या होत्या. उत्साहवर्धक बाब म्हणजे, यंदाच्या ऑगस्टमधील एकूण २.७८ लाख रोजगार संधींमध्ये, २.६० लाख लोकांना पूर्णवेळ रोजगाराची संधी मिळाली आहे. याआधी या आघाडीवर सर्वाधिक चांगली कामगिरी ही जुलै २०२१ मध्ये २.७ लाख नोकऱ्या आणि मार्चपूर्वी २.६७ लाख लोकांना रोजगार उपलब्धतेतून झाली आहे.

वाढलेल्या रोजगाराच्या संधी हे उद्योजकांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे लक्षण आहे. शिवाय उद्योग आता पूर्ण क्षमतेने सुरू होत असल्याचेही हे लक्षण आहे, असे एक्सफेनोचे सह-संस्थापक कमल कर्नाथ म्हणाले.

नोकरीविषयक संकेतस्थळ असलेल्या इनडीड.कॉमने दिलेल्या माहितीनुसार, नोकरभरती प्रक्रिया पुन्हा एकदा करोनापूर्व म्हणजेच फेब्रुवारी २०२० च्या पातळीवर आहे. करोना टाळेबंदीनंतर ज्या क्षेत्रात सर्वप्रथम शिथिलता आणली गेली आहे अशा क्षेत्रांमध्ये नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

उद्योग क्षेत्रामध्ये मार्चपासून निश्चितपणे गती निर्माण झाली आहे. करोना साथीचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेल्या १५ महिन्यांत, माहिती तंत्रज्ञान, उत्पादन निर्माण आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आशादायी वातावरण निर्माण झाले आहे आणि या क्षेत्रात नोकरदारांच्या शोधात असलेल्या कंपन्यांची अर्थात आपल्या ग्राहकांची संख्या चार टक्क्यांनी वाढली आहे, असे क्वेस कॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मोराजे यांनी सांगितले. अजूनही किराणा क्षेत्र, हॉटेल आणि विमान सेवा क्षेत्राने वेग पकडलेला नाही, हेही ते म्हणाले.

टाळेबंदीत शिथिलतेने ऑगस्टमध्ये घरकाम करणारे, काळजीवाहक (केअर टेकर), व्यवस्थापक, सुरक्षारक्षक आणि सफाई कामगारांच्या मागणीतदेखील ६० टक्के वाढ झाली आहे. अन्न आणि किराणा क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संख्येतही अनुक्रमे ५२ टक्के आणि ३९ टक्के वाढ झाली, तर मनुष्यबळ आणि वित्त क्षेत्रात भूमिकांची मागणी प्रत्येकी २७ टक्क्यांनी वाढली आहे.

वर्षभरात चार लाख नवीन संधी 

करोनामुळे डिजिटलायझेशन वाढल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील नोकऱ्यामध्ये वार्षिक आधारावर १७ टक्के वाढ झाली आहे. या क्षेत्रात प्रकल्प प्रमुख, अभियंता यासारख्या भूमिकांसाठी नोकरीच्या संधींमध्ये ८ ते १६ टक्के वाढ नोंदवण्यात आली. कर्नाथ यांच्या मते माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून आणखी १.५ लाखांहून अधिक नोक ऱ्या येत्या काळात खुल्या होतील. तर इतर क्षेत्रांत वर्षभरात सुमारे २.५ लाखांहून अधिक संधी उपलब्ध होण्याची आशा आहे.