‘सेबी’च्या चौकशीत म्युच्युअल फंड, पत मानांकन संस्थेची भूमिकांचाही तपास!
भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने अॅम्टेक ऑटो आणि तिची उपकंपनी कास्टेक्स टेक्नॉलॉजीज (पूर्वीची अॅम्टेक इंडिया)च्या समभागांच्या भावातील अनियमित चढ-उतारांच्या चौकशीची घोषणा केली आहे. गेले काही दिवस निरंतर पडझड सुरू असलेल्या समभागांनी परिणामी गुरुवारी अनुक्रमे ९ टक्के आणि ५ टक्क्य़ांच्या घसरणीची भर घातली.
अॅम्टेक समूहाने विदेशी चलनातील परिवर्तनीय रोख्यांद्वारे (एफसीसीबी) उभारलेल्या १३ कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जापैकी परतफेडीसाठी शिल्लक ८.८ कोटी डॉलरच्या रोख्यांचे सक्तीने कास्टेक्स टेक्नॉलॉजीजच्या समभागांमध्ये रूपांतरणाचा निर्णय घेतला आणि त्यासाठी कास्टेक्स टेक्नॉलॉजीजचे समभाग मूल्य कृत्रिमरीत्या फुगविल्याचा ‘सेबी’ला संशय आहे. ‘सेबी’ या संबंधाने झालेल्या समभागांच्या व्यवहारांचा तपशील तपासणार आहे. शिवाय, बँका, म्युच्युअल फंड आणि पतमानांकन संस्थांची यात भूमिका तपासली जाणार आहे.
वाहन उद्योगाला सुटय़ा भागांची आघाडीची पुरवठादार असलेल्या अॅम्टेक ऑटोची आर्थिक स्थिती डळमळल्याच्या परिणामी गेल्या महिन्याभरात या समभागाचे मूल्य तब्बल ८० टक्क्य़ांनी रोडावले आहे. तर रोखेधारकांनी सक्तीच्या समभाग रूपांतरणाविरोधात ओरड सुरू केल्याने कास्टेक्स टेक्नॉलॉजीजचा समभागही गेल्या दोन महिन्यांत ९० टक्क्य़ांनी गडगडला आहे. अॅम्टेक ऑटोच्या रोख्यांनी म्युच्युअल फंड उद्योगातही मोठा गदारोळ उडवून दिला आहे. कंपनीच्या आर्थिक व्यवहारातील ताज्या अनियमितता पाहता या रोख्यांचे पतमानांकन प्रतिष्ठित वित्तसंस्थेकडून खालावले गेल्यानंतर, त्यात गुंतवणूक असलेल्या जे पी मॉर्गन म्युच्युअल फंडाच्या दोन योजनांना गुंतवणूकदारांना युनिट्सच्या विक्रीच्या (रिडम्प्शन) कमाल मर्यादेवर र्निबध आणण्याचे अभूतपूर्व पाऊल टाकावे लागले आहे. जे पी मॉर्गनच्या या योजनांची या रोख्यांमध्ये सुमारे २०० कोटींची गुंतवणूक असल्याचे दिसून येत आहे.
कास्टेक्सच्या संचालकांनी शेअर बाजाराला दिलेल्या सूचनेप्रमाणे रोख्यांचे समभागांमध्ये १० सप्टेंबरला अंशत:, तर उर्वरित २५ सप्टेंबरला केले जाणार असल्याचे कळविले आहे. सेबीला या संबंधाने काही गैरव्यवहार आढळून आल्यास या सक्तीच्या रूपांतरणाला मज्जाव केला जाऊ शकेल, असा विश्लेषकांचा कयास आहे.
सलग ४३ दिवस
खालचे सर्किट!
अॅम्टेक समूहातील कास्टेक्स टेक्नॉलॉजीजचा समभाग १३ जुलै २०१५ रोजी ३६२ रुपयांच्या उच्चांकावर होता, त्यानंतर सलग ४३ व्यवहार झालेल्या दिवसात पाच टक्क्य़ांचे खालचे सर्किट लागून समभागाचा घसरणक्रम सुरू आहे. गुरुवारच्या आणखी ५ टक्क्य़ांच्या घसरणीने तो बीएसईवर ४३.३५ या वर्षांतील नीचांक पातळीवर स्थिरावला आहे. जगातील आठ देशांमध्ये व्यवसाय विस्तार, २०१४-१५ सालात सुमारे ३८०० कोटी रुपयांच्या महसुलावर २६७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावणाऱ्या प्रथितयश कंपनी आणि व्यवसायाचे, चुकीच्या व्यवस्थापनाने कसे वाटोळे होते, याचे कास्टेक्स टेक्नॉलॉजीजच्या रूपात अॅम्टेक समूहाने नमुनाच पेश केला आहे. अॅम्टेकने तिच्या रोख्यांचे समभागात रूपांतरणाचा निर्णय घेतल्यावर, मार्च २०१५ मधील वर्षांच्या नीचांक स्तरावरून कास्टेक्सच्या समभागाचे मूल्य अल्पावधीत तिपटीने फुगले. या रूपांतरणासाठी कास्टेक्सचा समभाग सलग ३० दिवस १७० रु. या भाव रेषेच्या वर राहणे अनिवार्य होते. ही मर्यादा पूर्ण केल्यानंतर मात्र समभागाची सलग घसरगुंडी सुरू असून, या घडामोडींची माहिती नसलेले सामान्य गुंतवणूकदार मोठय़ा नुकसानीसह हात चोळत बसले आहेत.
अॅम्टेक-कास्टेक्सच्या समभागांत भाव-लबाडी
बँका, म्युच्युअल फंड आणि पतमानांकन संस्थांची यात भूमिका तपासली जाणार आहे.
Written by रत्नाकर पवार
First published on: 11-09-2015 at 00:08 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emteck castecs shares may fraud