रिझव्‍‌र्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पात सोन्यात होणारी गुंतवणूक कमी करण्याच्या उद्देशाने किरकोळ किमतीवर आधारित महागाई निर्देशांकाशी निगडित परतावा देणाऱ्या रोख्यांची घोषणा केली होती. रिझव्‍‌र्ह बँकेने अर्थसंकल्पातील या घोषणेस अनुसरून ऑगस्ट २०१३ मध्ये याविषयी परिपत्रक जारी केले होते. नोव्हेंबर महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेने घोषणा करून डिसेंबर २०१३ मध्ये या रोख्यांच्या विक्रीस सुरुवात केली.

सर्व राष्ट्रीयीकृत बँका व मोठय़ा तीन खासगी बँकांच्या माध्यमातून या विक्रीसाठी अर्ज उपलब्ध करून दिले. परंतु या बँकांच्या निष्क्रियतेमुळे हे अर्ज या बँकांनी उपलब्ध करून दिले नाहीत. ही गोष्ट प्रसारमाध्यमांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या लक्षात आणून दिल्यावर रिझव्‍‌र्ह बँकेने या बँकांना हे अर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. ‘अर्थ वृत्तान्त, लोकसत्ता’नेही याबाबत वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले आहे. योजना जाहिर झाल्यानंतर संबंधित बँकांमध्ये योजनेचे अर्ज उपलब्ध नसल्याची बाब याद्वारे निदर्शनास आणली होती. दरम्यान या रोख्यांना लाभलेल्या अल्प प्रतिसादामुळे विक्री बंद होण्याची तारीख वाढवून ३१ डिसेंबर २०१३ वरून ३१ मार्च २०१४ करण्यात आली होती.
पुढील एका वर्षांसाठी ११.४५ टक्के दर आकर्षक असूनही वितरकांच्या अनुत्साहामुळे एका चांगल्या योजनेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद लाभलेला नाही. ‘सार्वजनिक हिताच्या असलेल्या या योजनेस मिळावा तितका प्रतिसाद लाभला नाही. बँकांनी ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. हे रिझव्‍‌र्ह बँकेचे रोखे असल्याने मुद्दलाची सर्वोच्च सुरक्षितता असल्याने व व्याजाचा दर आकर्षक असल्याने या रोख्यांना भरघोस प्रतिसाद लाभणे अपेक्षित होते. बँकांना ही सेवा पुरविल्याबद्दल हाताळणी शुल्कात अध्र्या टाक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. या आधी देय असलेल्या एक टक्क्याच्या सेवा शुल्काव्यतिरिक्त अर्धा टक्का शुल्क प्रोत्साहनपर देण्यात येणार आहे. या वाढीव शुल्कामुळे बँका जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत ही योजना नेतील व किमान १०० कोटी रुपये या योजने अंतर्गत जमा होतील’, असे रिझव्‍‌र्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेची ही योजना किरकोळ ग्राहकांसाठी आकर्षक योजना असून ज्येष्ठ नागरिक एका वर्षांनंतर तर अन्य गुंतवणूकदार तीन वर्षांनंतर हे रोखे परत करू शकतात. मुद्दलाची सुरक्षितता लक्षात घेता एका वर्षांसाठी ११.४५ टक्के व्याजाचा दर आकर्षक असून जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत या योजनेत एक गुंतवणूकदार रक्कम गुंतवू शकतो.

चंद्रशेखर पुरोहित,
पुरोहित इन्वेस्टमेन्ट कन्सल्टन्सी, ठाणे.

 

 

Story img Loader