एखाद्या उद्योगाला प्रोत्साहन देणे हा त्या उद्योगाला संपविण्याचा हमखास मार्ग असतो. त्यामुळे धोरणकर्त्यांनी उद्योगांची दिशा ठरवणे टाळले पाहिजे, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. यावेळी राजन यांनी विशिष्ट उद्योगक्षेत्राला देण्यात येणाऱ्या सवलतींना जोरदार विरोध दर्शविला. याशिवाय, राजन यांनी औद्योगिक संघटनांकडून ‘काहीतरी करा’ अशा छापाच्या करण्यात येणाऱ्या मागण्याविषयीही दुमत दर्शविले. निर्यात वाढविण्यासाठी रूपयाचे अवमुल्यन करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, भारतीय व्यापारातील मंदीसाठी चलनाची किंमत कारणीभूत नसल्याचे राजन यांनी म्हटले.
मागणी वाढविण्यासाठी पुढारलेल्या देशांच्या अर्थव्यवस्था भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आक्रमक आर्थिक धोरणे राबवून त्या अर्थव्यवस्थांवर धोका लादतात. गुंतवणुकदारांच्या धोका पत्कारण्याच्या या वृत्तीमुळे एक दिवस आपल्या अर्थव्यवस्थेत भांडवल गुंतवणुकीची मोठी लाट येणार आहे. मात्र, गुंतवणुकदारांनी धोका न पत्करण्याचे ठरविल्यानंतर तितक्याच प्रमाणात भांडवल बाहेर जाईल, असा इशारा राजन यांनी दिला.
मला अनेकदा अशा प्रश्न विचारला जातो की, आपण कोणत्या उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मात्र, माझ्या मते उद्योगांना प्रोत्साहन देणे हा त्या उद्योगांना संपविण्याचा हमखास मार्ग आहे. त्यामुळे धोरणकर्ते म्हणून उद्योगांना अनुकूल वातावरण निर्माण करावे, उद्योगांची दिशा ठरवू नये, असे रघुराम राजन यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा