मुंबई : भांडवली बाजारातील भीतीदायी अस्थिरतेच्या वातावरणातही गुंतवणूकदारांची समभाग संलग्न अर्थात ‘इक्विटी’ म्युच्युअल फंडांना पसंतीक्रम कायम राहिल्याचे, सरलेल्या जून महिन्यातील या फंडातील १५,४९८ कोटी रुपयांच्या दमदार गुंतवणुकीने दाखवून दिले आहे. इक्विटी फंडांमध्ये सलग १६ व्या महिन्यात सकारात्मक प्रवाह कायम राहिला, असे ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाने (अॅम्फी)’ शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.
आधीच्या मे महिन्यांत ‘इक्विटी फंडां’मध्ये १८,५२९ कोटी रुपयांची निव्वळ भर नोंदविली गेली होती. त्या तुलनेत सरलेल्या जून महिन्यात योगदान १६.३ टक्क्यांनी घटले असले तरी नक्त गुंतवणूक सकारात्मक राहिली आहे. जागतिक पातळीवरील भू-राजकीय घडामोडी, जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केली जाणारी व्याजदर वाढ या परिणामी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या समभाग विक्रीच्या परिणामी प्रत्यक्ष बाजारात मोठी पडझड झाल्याचे दिसले आहे.
मार्च २०२१ पासून म्हणजे सलग १६ महिने समभागसंलग्न (इक्विटी) योजनांमध्ये नक्त ओघ आधीच्या महिन्याच्या तुलनेत वाढत आला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये समभाग गुंतवणुकीविषयी सकारात्मक भावना दिसून येत आहे. त्यापूर्वी, जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२१ या आठ महिन्यांत समभागसंलग्न योजनांमधून निरंतर निर्गुतवणुकीतून, एकूण ४६,७९१ कोटी रुपयांची गळती दिसून आली होती.
समभागसंलग्न योजनांतील सर्व श्रेणींमध्ये जून महिन्यातील प्रवाह सकारात्मक राहिला असून फ्लेक्सी-कॅप फंड श्रेणी ही २,५१२ कोटी रुपयांच्या निव्वळ ओघासह सर्वात मोठी लाभार्थी ठरली. शिवाय, मल्टी-कॅप फंडाने २,१३० कोटी रुपयांहून अधिक नक्त गुंतवणूक मिळविली.
या उलट रोखे म्युच्युअल फंडातून सरलेल्या महिन्यात ९२,२४७ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली आहे. आधीच्या मे महिन्यात त्यात ३२,७२२ कोटींची निव्वळ गुंतवणूक झाली होती. तर एकूण म्युच्युअल फंडातून जूनमध्ये ६९,८५३ कोटींचा निधी आटला आहे. मे महिन्यात त्यातून केवळ ७,५३२ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली होती. जून अखेरीस म्युच्युअल फंड घराण्यांकडील एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता ३७.३७ लाख कोटींवरून कमी होत ३६.९८ लाख कोटीं रुपयांवर खालावली आहे.
भांडवली बाजारातून परदेशी गुंतवणुकीचे निर्गमन
भांडवली बाजारासाठी सरलेला जून महिना मागील दोन वर्षांतील सर्वात सुमार कामगिरीचा राहिला. कारण सरलेल्या महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ५०,२०३ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली आहे. अमेरिकी फेडरल रिझव्र्हकडून करण्यात येणारी आक्रमक दरवाढ आणि देशांतर्गत समभागांचे उच्च मूल्यांकन यामुळे सलग नवव्या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांची समभाग खरेदीपेक्षा विक्रीला प्राधान्य दिल्याचे दिसले आहे.