भारताच्या खासगी क्षेत्रातील दुसऱ्या मोठय़ा तेल शुद्धीकरण कंपनीतील ४९ टक्के हिस्सा एस्सार बंधूंनी गुरुवारी एका रशियन कंपनीला विकला. बाजारातील सूचिबद्ध एस्सार ऑइलमधील ४९ टक्के हिस्सा रशियाच्या रोसनेफ्टला ३.२ अब्ज डॉलरना विकल्याचे समजते.
ब्रिक्स परिषदेच्या व्यासपीठावर याबाबतच्या करारावर रोसनेफ्टचे अध्यक्ष इगोर सेचिन व एस्सार समूहाचे संस्थापक शशी रुईया यांनी बुधवारी स्वाक्षरी केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ब्रिक्स दौऱ्यावर आहेत.
रोसनेफ्ट ही जगातील आघाडीची तेल उत्पादक कंपनी सरकारी मालकीची आहे, तर तिची मोठी व्यावसायिक भागीदार बनलेल्या एस्सार ऑइलचे देशभरात १,६०० पेट्रोल पंप आहेत. एस्सार ऑइलने काही दिवसांपूर्वीच आपल्या पेट्रोल पंपांची संख्या येत्या तीन वर्षांत ५,००० वर नेण्याचे जाहीर केले होते.
हा व्यवहारातून एस्सार ऑइलमधील कोळशावर आधारित मुंबईस्थित मिथेन व्यवसाय मात्र बाजूला ठेवण्यात आला आहे. हिस्से खरेदी व्यवहाराबरोबरच रशियन कंपनीने एस्सार ऑइलला प्रति वर्ष एक कोटी टन (प्रति दिन दोन लाख पिंप) कच्चे तेल देण्याचे मान्य केले आहे.  यातून कच्च्या तेलासाठी तिची इराणवरील मदार कमी होईल. एस्सार ऑइलच्या गुजरातमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पाची गेल्या दशकभरापासून वार्षिक दोन कोटी टन (प्रति दिन ४.०५ लाख प्रति पिंप) तेल उत्पादन क्षमता राहिली आहे. एस्सार ऑइलमधील मिथेन व्यवसायासाठी कंपनी विविध पाच खोऱ्यांतून १० लाख कोटी क्युबिक फूट वायू उत्पादन करते. एस्सार ऑइलमध्ये मुख्य प्रवर्तक शशी व रवी या रुईया बंधूंचा ९०.५ टक्के हिस्सा होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा