भारतीय हवाई क्षेत्रात वाढीव विदेशी गुंतवणुकीचा मार्ग खुला झाल्यानंतर त्याच्या स्वागतापर होऊ घातलेला पहिला सौदा जेट-इतिहाद व्यवहाराभोवती शक्याशक्यतेचे ढग जमा झाले आहेत. दुबईची सरकारी विमान कंपनी इतिहादमार्फत या सौद्याचा फेरआढावा घेण्याच्या संकेताने देशातील सर्वात मोठी विमानसेवा जेट एअरवेजला पुन्हा अनिश्चिततेने घेरले, इतकेच नाही तर कंपनीच्या समभागांचे बाजार भांडवलही सोमवारी तब्बल ४१२ कोटी रुपयांनी खाली आले.
जेटमधील २४ टक्के हिस्सा १,८०० कोटी रुपयांना खरेदी करण्याची तयारी इतिहादने काही दिवसांपूर्वी दर्शविली होती. एवढेच नव्हे तर इतिहादचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेख हमीद यांनी याबाबत चालू आठवडय़ात व्यवहार होण्याचे संकतेही दिले होते. हा व्यवहार सुरळीत होण्यासाठी उभय कंपन्यांच्या प्रमुखांनी केंद्र सरकारमधील संबंधित विविध खात्याच्या मंत्र्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. मात्र आता इतिहादकडून या संभाव्य व्यवहाराच्या फेरआढाव्याबाबत मत प्रदर्शित केले गेल्याने जेटच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भांडवली बाजारात या वृत्ताने कंपनीच्या समभागाने सत्रादरम्यान ९ टक्क्यांपर्यंतची आपटी खाल्ली. दिवसअखेरही कंपनीचे बाजार भांडवल ४१२ कोटी रुपयांनी खाली आले.