प्रीमियम मोबाइल टॅक्सी सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या टॅबकॅबने संपूर्ण मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात विस्तार करण्याचे निश्चित केले असून यासाठी कंपनीला आणखी १,२०० वाहनांची गरज भासणार आहे. तथापि विद्यमान टॅक्सी परवान्यांसाठीच्या कठोर अटींमुळे कंपनीला वाहनचालकांची मोठी चणचण भासत आहे.
विद्यमान व्यवस्थेत पश्चिम मार्गावर विरापर्यंत तर हार्बर मार्गावर बेलापूपर्यंत सेवा देणाऱ्या टॅबकॅबने डहाणू, अलिबागपर्यंत सेवा देण्याचे धोरण आखले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई परिसरात दूरवर जाणाऱ्या प्रवाशांसाठीदेखील दोन ते तीन दिवसांसाठी टॅक्सी सेवा पुरविण्याचा विचारही कंपनी करत आहे.
कंपनीच्या ताफ्यात सध्या २,८०० गाडय़ा आहेत. यामध्ये टोयोटा इटिऑस तसेच टॅबकॅब गोल्डसाठी मारुती सुझुकी एसएक्स४ यांचा समावेश आहे. यामार्फत कंपनी सध्या दिवसाला ९ हजारांपर्यंत प्रवासी वाहतूक करते. विस्तार धोरणपूर्तीसाठी कंपनीला येत्या वर्षभरात आणखी १,२०० वाहनांची ताफ्यात भर घालावी लागणार आहे. त्यासाठी अधिकाधिक चालकांचीही निकड प्रतिपादन करतानाच महाराष्ट्राच्या टॅक्सी परवाना क्षेत्रात चालकांसाठी असलेल्या अटी अडचणीच्या ठरत आहेत.
याबाबत कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी प्रसन्नजीत बागची यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, मुंबईत टॅक्सीचालकांसाठी १५ वर्षे निवासी तसेच किमान ५ वर्षांपूर्वीच्या शिधापत्रिकेची अट वाहनचालक मिळविण्यास अडचणीची आहे. मुदत संपलेल्या काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्या चालकांसाठी कंपनीने ५५५ योजना राबविली असून सध्या तिला १५ ते २० टक्के प्रतिसाद मिळत आहे. माहिती तंत्रज्ञानावरील मोबाइल, एसएमएस, इंटरनेट आदी पर्यायांचा अधिकाधिक उपयोग ही सेवा अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यासाठी कंपनी करत असून या क्षेत्रातील अत्याधुनिक सॉफ्टवेअर विकसित करण्याच्याही तयारीत आहे.