गेल्या आर्थिक वर्षअखेरच्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वेग ५ टक्क्यांच्या आत विसावताना एकूण आर्थिक वर्षांतही त्याने अपेक्षेप्रमाणे दशकाचा तळ गाठला आहे. वर्षभरापूर्वीच्या ५.१ टक्क्यांच्या तुलनेत यंदाच्या जानेवारी ते मार्च या कालावधीत सकल राष्ट्रीय उत्पादन ४.८ टक्क्यांवरच राहिले आहे. तर एकूण २०१२-१३ या वर्षांतही दर ५ टक्क्यांच्या काठावरच आहे.
केंद्रीय सांख्यिकी संघटनेने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, निर्मिती, खनिकर्म तसेच कृषी क्षेत्रातील संथ वातावरणाने देशाचा विकास दर यंदा अपेक्षित असा ५ टक्क्यांच्या खाली आला आहे. सरकार दफ्तरीही यंदाचे सकल राष्ट्रीय उत्पादन हे अपेक्षित असेच वर्णिले गेले आहे.
चालू आर्थिक वर्षांसाठी देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर ६.१ ते ६.७ टक्के अपेक्षित केला आहे.
गेल्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तीन तिमाहीत विकासाचा दर अनुक्रमे ५.४, ५.२ व ४.७ टक्के राहिला आहे. तर वर्षभरापूर्वी शेवटच्या तिमाहीत ५.१ टक्के असणारा अर्थव्यवस्थेचा वेग यंदाच्या चौथ्या तिमाहीत ४.८ टक्क्यांवर आला आहे. आधीच्या वर्षांतही देशाचा विकास दर ६.२ टक्के होता. तर यंदाच्या वर्षांत गाठलेला ५ टक्के दर हा २००२-०३ मधील ४ टक्क्यानंतरचा सर्वात कमी म्हणून नोंदला गेला आहे.
जानेवारी ते मार्च २०१३ दरम्यान निर्मिती क्षेत्राचा वेग वार्षिक तुलनेत वाढला असला तरी एकूण ही वाढ मोठय़ा प्रमाणात नसल्याने त्याचा परिणाम एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनावर झाला आहे. देशाच्या आर्थिक विकासात निर्मिती क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे. खनिकर्म क्षेत्राची गेल्या तिमाहीतील वाढ वर्षभरापूर्वीच्या ५.२ टक्क्यांवरून थेट ३.१ टक्क्यांवर आली आहे. एकूण वर्षांत मात्र ती ०.६ अशी स्थिर राहिली आहे.
कृषी क्षेत्राचा वेगही तिमाही तसेच एकूण आर्थिक वर्षांत २ टक्क्यांच्या आत राहिला आहे. यापूर्वी तो दोन्ही कालावधी या टप्प्याच्या वर होता. बांधकाम क्षेत्रातही एक टक्क्यांची घट तिमाही आणि संपूर्ण वर्षांत झाली आहे. व्यापार, आदरातिथ्य, वाहन तसेच दळणवळन क्षेत्राने तिमाहीत वाढ तर एकूण वर्षांत किरकोळ घट नोंदविली आहे.
विमा, गृहनिर्माण आदींचा समावेश असलेल्या सेवा क्षेत्रानेही यंदा एकेरी आकडय़ातील वाढ राखली आहे. गेल्या तिमाहीत या क्षेत्राचा वेग ९.१ टक्के तर गेल्या वर्षांत ८.६ टक्के राहिला आहे. वर्षभरापूर्वी चौथी तिमाही तसेच एकूण आर्थिक वर्षांत सेवा क्षेत्राचा प्रवास दुहेरी आकडय़ात होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा