आगामी वर्षांत जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल असे भविष्य वर्तवित, आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘स्टॅण्डर्ड अॅण्ड पूअर्स’ने भारताचा संभाव्य विकास दर ६.५% या आश्वासक टप्प्यावर नेऊन ठेवला आहे. विकासदराचा हा ताजा कयास आजवर विविध आंतराराष्ट्रीय संस्था इतकेच काय भारतीय प्रशासकीय पातळीवर व्यक्त झालेल्या अंदाजापेक्षाही खूपच सरस आहे.
जागतिक अर्थव्यवस्था सावरण्याचा चेंडू आता धोरणकत्यार्ंच्या कोर्टात असल्याचे नमूद करून ‘एस अॅण्ड पी’ने शेजारच्या चीनचीही प्रगती ७.४% वरून पुन्हा ८% च्या दिशेने होईल, असा आशावादी सूर काढला आहे. गेल्या काही वर्षांचा काळ खूपच आव्हानात्मक होता, असे नमूद करून या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अर्थतज्ञांनी, २०१३ मध्ये अर्थविकासाच्या बाबतीत फारशा चुका होणार नाहीत, असा दावाही केला आहे.
‘एस अॅण्ड पी’ने अंदाजलेल्या विकासदराच्या तुलनेत अन्य आंतराराष्ट्रीय संस्था तसेच भारतात प्रशासकीय पातळीवर व्यक्त केले गेलेले अंदाज खूपच कमी आहेत. नियोजन आयोग, रिझव्र्ह बँक, केंद्रीय अर्थखाते या सर्वानी विकासदराचे लक्ष्य जेमतेम ६% राहिल असे सांगितले असताना, ‘एस अॅण्ड पी’चा अंदाज (६.५%) मात्र संयुक्त राष्ट्राच्या ६.८% नंतर सर्वाधिक आशादायी आहे. अलीकडेच डिसेंबरच्या सुरुवातीला आशियाई विकास बँकेने सर्वात कमी ५.४% विकासदर अंदाजला आहे.
पूर्वपदावर येत असलेला जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रवास पाहता काही विकसनशील देशांचे पतमानांकन सुधारले जाऊ शकते, असे ‘एस अॅण्ड पी’ने कोणत्याही देशाचा नामोल्लेख न करता सांगितले आहे.
पुढील वर्षांत सव्वा टक्क्यांची व्याजदर कपात : आरबीएस बँक
आगामी वर्षांत वस्तू व कृषी-जिनसांच्या वायदा बाजारातील किंमतींसह एकूण महागाईदर कमी होण्याच्या आशेवर ब्रिटनच्या ‘आरबीएस’ बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेचा वेगही ६.३%ने प्रगती करेल, असे म्हटले आहे. डिसेंबरच्या धोरणात व्याजदर टाळणारी रिझव्र्ह बँक २०१३-१४ या आर्थिक वर्षांत किमान सव्वा टक्क्याने व्याजदरात कपात करेल, असेही बँकेने सूचित केले आहे. या कालावधीत देशाची वित्तीय तसेच व्यापारी तूट कमी होऊन बचतदरात वाढही अपेक्षित असल्याचे तिने म्हटले आहे.