जसे शेअर बाजारासाठी ‘सेन्सेक्स’ हा निर्देशांक तसेच अमूल्य हिऱ्यासाठी ‘सॉलिटेअर प्राइस’ हा निर्देशांक बनून पुढे येताना दिसत आहे. स्त्रीचा कायम सोबती असलेला हिरा हा गुंतवणूकदारांचा सांगाती बनावा, अशा प्रयत्नांतून ‘डिव्हाइन सॉलिटेअर’ने या निर्देशांकाची घडणी केली आहे.
हिऱ्याचा खरा पारखी बनणे ही प्रत्येकाच्या आवाक्यातील गोष्ट नाही. विशेषत: हिऱ्यांना गुंतवणुकीच्या दृष्टीने मिळत असलेली वाढती पसंती पाहता, त्याची अस्सलता व कस मोजण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि किमतीबाबत ठोस मानदंड असावेत या उद्देशानेच ‘सॉलिटेअर प्राइस इंडेक्स’ हा निर्देशांक विकसित करण्यात आला असल्याचे डिव्हाइन सॉलिटेअर या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जिग्नेश मेहता यांनी सांगितले.
अशा प्रकारे देशस्तरावर सामायिक मानदंड व समान किंमत रचना असलेला डिव्हाइन सॉलिटेअर हा देशातील हिऱ्याचा पहिलाच ब्रॅण्ड आहे. प्रत्येक डिव्हाइन सॉलिटेअर हिऱ्याची आयजीआय/ जीआयए या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लॅबॉरेटरीज् व्यतिरिक्त डीएस लॅबकडूनही स्वतंत्र पारख करून श्रेणी व प्रमाणपत्र दिले जाते, असे मेहता यांनी सांगितले.
आजच्या घडीला भारतात वार्षिक ६५ ते ७० टक्के दराने मौल्यवान खडय़ांच्या मागणीत वाढ होत आहे. ही हिरे खरेदी केवळ दागिन्यांमध्ये सजविण्यासाठी निश्चितच नसून एक गुंतवणूक म्हणूनही असल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असे मेहता यांनी स्पष्ट केले. हिऱ्याच्या किमती या सोने-चांदी या अन्य मौल्यवान धातूंप्रमाणे मागणी-पुरवठय़ातील वाढती तफावत आणि चलन बाजारातील चंचलतेतून वधारत आहेत.
डिव्हाइन सॉलिटेअर हिरे हे देशभरात ३९ शहरात निवडक ७० आभूषण विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. येत्या काळात आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातील हिरे-खाणीतून लक्षणीयरित्या घटलेला पुरवठा, तसेच कॅनडा व रशिायातील नव्या खाणींपुढेही असलेल्या अडचणी पाहता हिऱ्याच्या किमती कमालीच्या वाढतीस, असा कयास मेहता यांनी व्यक्त केला.
हिरे-पारखाचे १ २ ३..!
हिऱ्याला मूल्य मिळवून देणारे विविध १२३ निकष अस्तित्त्वात असून, खऱ्या पारखीकडून हे सर्व निकष तपासल्यानंतर हिऱ्याची खरी किमत ठरविली जाते. तरीही यातील प्रामुख्याने चार ‘सी’ अर्थात कलर (रंग), कट (पैलू), क्लॅरिटी (सुस्पष्टता) आणि कॅरट हे किमत ठरविण्याचे महत्त्वाचे निकष आहेत. १ मार्च २०१३ रोजी हिऱ्याने प्रति कॅरट ३.३८ लाख अशी सर्वोच्च किंमत मिळविल्याचे ‘सॉलिटेअर प्राइस’ निर्देशांकाने दर्शविले. अवघ्या महिन्याभरात हिऱ्याच्या किमतीत झालेली ही ०.६ टक्के इतकी वाढ आहे. कमाल विक्री किमतीचा प्रघात सुरू करणाऱ्या डिव्हाइन सॉलिटेअरकडून हिऱ्याच्या पुनर्खरेदीची हमी असल्याने चागला परतावा देणारा हा गुंतवणुकीचा पर्याय निश्चितच ठरतो.