मुंबई : आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तंत्र, जोखीम आणि गुंतवणूक सातत्य ही त्रिसूत्री आवश्यक आहे. सरकारी आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळत असतो, तरीही महागाई कायमच वरचढ ठरत असल्याने तिला मात देण्यासाठी प्रत्येकाने सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि दीर्घकालीन नियोजनाचे काटेकोर शिस्तीने पालन करणे आवश्यक आहे. यातूनच आर्थिक ध्येयपूर्ती सहजसाध्य होईल, असा कानमंत्र ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ सत्रात मंगळवारी देण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या गुंतवणूकदार जागराचे आयोजन करण्यात आले होते. आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे- आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड प्रस्तुत हा कार्यक्रम महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञान केंद्रात पार पडला.
आयुष्यभराची कष्टाने कमावलेली पुंजी कधी, कुठे आणि किती गुंतवायची हा प्रश्न सर्वप्रथम विचारात घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा आजूबाजूला अनेक प्रलोभने असल्याने भविष्यात गुंतवणूक करू, अशा चालढकलीतून गुंतवणुकीचा श्रीगणेशा टाळला जातो. तर सुरू असलेली गुंतवणूक थांबवली जाते. मात्र एकदा गुंतवणूक सुरू केली की ती थांबवू नये, असा महत्त्वाचा सल्ला वित्तीय नियोजनकार कौस्तुभ जोशी यांनी दिला.
गुंतवणूक करताना ‘अॅसेट अलोकेशनह्ण म्हणजेच मालमत्ता विभाजन हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. बऱ्याचदा एकाच गुंतवणूक साधनांमध्ये सर्व पैसा टाकला जातो. महागाईवर मात करणाऱ्या परताव्यासाठी समभाग, म्युच्युअल फंडासह वैविध्यपूर्ण गुंतवणूक आवश्यक आहे. मात्र गुंतवणूकदारांनी अभ्यास करून शेअर बाजारात गुंतवणूक केली पाहिजे. अन्यथा म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. तरुण वयापासून कमीत कमी का होईना सातत्यपूर्ण व शिस्तबद्ध गुंतवणूक करीत राहिल्यास, उत्तर आयुष्यात त्यातून थोडे थोडे काढून ते हयातभर पुरू शकते, अशी किमया घडवून आणणारे ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन – एसआयपी’ म्हणजे अक्षय्य ऊर्जास्रोतच आहेत, असे कौस्तुभ जोशी यांनी सांगितले.
निवृत्तीपश्चात नियोजनाच्या मधुर फळांचा आस्वाद घेण्यासाठी दीर्घकाळात जोखीम-गुंतवणूक ताळमेळ राखत मार्गक्रमण गरजेचे आहे. अर्थात गुंतवणुकीचे हे नियोजन कमीत कमी पाच ते सात वर्षांचे असायला हवे, असे जोशी म्हणाले. नोकरीला लागल्यापासून, निवृत्त जीवनाविषयी नियोजनाच्या दिशेने गुंतवणुकीला सुरुवात करणे आदर्शवत ठरेल, असे त्यांनी पगारदारांना उद्देशून सूचित केले. कार्यक्रमाच्या शेवटी गुंतवणूकदारांकडून आलेल्या प्रश्नांचे निरसनही वक्त्यांनी केले. वक्ते आणि श्रोते यांच्यातील दुवा म्हणून सुनील वालावलकर यांनी समन्वयकाची भूमिका बजावली.
सध्याच्या काळात आर्थिक शिस्त पाळणे निकडीचे आहे. विशेषत: पगारदार व्यक्तींनी आर्थिक व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या अर्थसाक्षरता कार्यक्रमात सांगितलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यानुसार आर्थिक नियोजनाद्वारे आर्थिक ध्येयपूर्तीकडे वाटचाल केली पाहिजे.
– अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका