सलग चार दिवसातील तेजी मोडून काढत मुंबई निर्देशांकाने आज शतकी घसरण नोंदविली. कंपन्यांच्या तिमाही निकालाचा दबाव गुंतवणूकदारांना नफेखोरीसाठी उद्युक्त करता झाला. मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ ९२.६६ अंश घसरणीसह १९,६९१.४२ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ २७.७५ अंश नुकसानासह ५,९८८.४० वर बंद झाला.
नव्या वर्षांतील दुसऱ्या आठवडय़ाची सुरुवात मुंबई शेअर बाजाराने घसरणीने केली आहे. गेल्या चारही सत्रातील तेजीमुळे निर्देशांक तब्बल ३५८ अंशांने वधारला होता. असे करताना तो १९,८०० च्या नजीक पोहोचला होता. तर निफ्टीनेही गेल्या आठवडय़ात १.५ टक्के वाढ नोंदविल्याने ६ हजाराचा टप्पा पार केला होता.
चालू आर्थिक वर्षांतील तिसऱ्या तिमाहीचे कंपन्यांचे वित्तीय निष्कर्ष आता जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. परिणामी त्याचा दबाव आज गुंतवणूकदारांवर विजय मिळविताना दिसत होता. परिणामी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, एचडीएफसी बँक, आयटीसी, हिंदुस्थान यूनिलिव्हरसारख्या आघाडीच्या समभागांच्या नफेखोरीमुळे मुंबई निर्देशांकही सप्ताहारंभी ९३ अंशांने कोसळला. तर निफ्टीतील घसरण २८ अंशांची ठरली.
भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक आजच्या घसरणीत सर्वाधिक बळी ठरले. तर रिलायन्स, टाटा मोटर्स, भारतीय स्टेट बँक, टीसीएसच्या समभागांचीही विक्री झाली. मारुती सुझुकी, इन्फोसिस, ओएनजीसी, टाटा स्टीलसारख्या समभागांच्या खरेदीमुळे मुंबई निर्देशांकातील मोठी घसरण रोखली गेली. प्रमुख कंपन्यांचे वित्तीय निष्कर्ष इन्फोसिसच्या ११ जानेवारीच्या प्रारंभाने सुरू होणार आहेत. दरम्यान, ‘सेन्सेक्स’च्या ०.४७ टक्के घसरणीतही मारुती सुझुकीच्या समभागाने आजच्या दिवसभराच्या सत्रातवर्षांचा उच्चांकी भाव मिळविला. कंपनीच्या समभागाला ‘सीएलएसए’ या वित्तसंस्थेच्या शेऱ्यात सुधार झाल्याने मारुती सुझुकी दिवसअखेर २.५९ टक्क्यांसह १,५८४ रुपयांवर स्थिरावला.
दिवसभरात तो ३.५ टक्क्यांनी उंचावत १,५९९.९० रुपयांचा भाव मिळवताना ५२ आठवडय़ाच्या उच्चांकावरच्या टप्प्यावर होता. तर संभाव्य इंधन दरवाढीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील ‘ओएनजीसी’ आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल क्षेत्रातील कंपन्यांचे समभागांनीही मोठा भाव खाल्ला. ‘सेन्सेक्स’मधील ३० पैकी १९ समभाग घसरले. घसरणीत २.३५ टक्क्यांसह ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ हा आघाडीवर होता.
रुपया दीड महिन्याच्या नीचांकावर
नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना प्राथमिक वाढ टाळून डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन सोमवारअखेर १६ पैशांनी घसरले. परिणामी ५५ च्याही खाली उतरलेला रुपया दीड महिन्याच्या नीचांकावर येऊन ठेपला आहे. २०१३ ची सुरुवात करताना रुपया २ जानेवारी रोजी ५४.३५ या वरच्या टप्प्यावर होता. मात्र गेल्या तीनही सत्रात त्यात घसरण होत गेली आहे. शुक्रवारी तर तो तब्बल ५७ पैशांनी घसरला होता. याचवेळी त्याने ५५ च्या खालची पातळी ओलांडली होती. त्यात आजही १६ पैशांच्या घसरणीची भर पडल्याने रुपया आता डॉलरच्या तुलनेत ५५ च्या खाली कायम, ५५.२३ पर्यंत आला आहे. रुपयाची यापूर्वीची ५५.४५ ही नीचांकी २७ नोव्हेंबर २०१२ रोजी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा