जागतिक स्तरावर कमी होत असलेले खनिज तेल दर व वायदा वस्तूंच्या घसरणाऱ्या किंमतीमुळे भारताच्या आयात खर्चात बचत होणार असून हा निधी विविध सामाजिक सुरक्षा योजना तसेच पायाभूत सेवा क्षेत्रासाठी उपयोगात येईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला.
तेल दरातील घुसळण ही संपत्तीचे पुर्नवितरण असून त्याचा लाभ तेल उत्पादक देश ते तेल ग्राहक देश या साऱ्यांनाच मिळतो, असेही अर्थमंत्र्यांनी नमूद केले. आधीच्या तुलनेत निम्म्यावर आलेल्या तेलाच्या किंमतींचा भारतासारख्या देशाला निश्चितच फायदा होईल, असेही ते म्हणाले.
भारत हा त्याच्या गरजेपैकी तब्बल ८० टक्के तेल आयात करतो. यापोटी २०१४-१५ मध्ये सरकारचे १२४ अब्ज डॉलर खर्च झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमतींमध्ये गेले काही दिवस कमालीचा उतार नोंदला गेला आहे. अनेक सत्रांमध्ये तेल दर प्रति पिंप ४० डॉलपर्यंत राहिले. त्याचबरोबर जागतिक स्तरावर विविध वायदा वस्तूंच्या किंमतीतही घसरण अनुभवली गेली. दोन दिवसांपासून मात्र तेल दरांत पुन्हा वाढ होत आहे.
भारताबाबत अर्थमंत्री म्हणाले की, सुदैवाने भारत हा कधीही तेल निर्यातदार राहिला नसल्याने त्याची या जिनसाबाबत निर्भरताच अधिक राहिली आहे.
तेव्हा कमी दर होत असलेले तेल अथवा अन्य वायदा वस्तू स्वस्त झाल्या तर अधिक बचत करता येईल व हा निधी सामाजिक सुरक्षा योजना, पायाभूत सेवा क्षेत्रावर खर्च करता येईल.

Story img Loader