केंद्रीय अर्थसंकल्प येत्या २९ फेब्रुवारीला लोकसभेमध्ये सादर केला जाईल. काय स्वस्त आणि काय महाग होणार? यासोबतच कर आकारणीचे स्वरुप कसे असेल? अशा थेट खिशात हात घालणाऱया बाबींवर सर्वसामान्यांपासून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत सर्वांचेच लक्ष असते. याच पार्श्वभूमीवर क्रिकेटची अविरत सेवा केलेला भारताचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू अमोल मुझुमदार देखील यंदाच्या अर्थसंकल्पातील आशा-अपेक्षांबाबत व्यक्त झाला..
मला खेळापेक्षा सध्या शेतकऱयांचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱयांना दिलासा मिळेल किंवा त्यांच्यासाठी काहीतरी योजना, निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, अशी आशा आहे. शेतकरी हा समाजाचा पोशिंदा आहे. त्याला जगवलंच पाहिजे. त्याचे प्रश्न आधी सोडवायला हवेत, असं माझं ठाम मत आहे.
क्रीडा मंत्रालयाने आता ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. केंद्रीय बजेटमध्येही ऑलिम्पिकमधील समावेशासाठी खेळाडूंना जागतिक स्वरुपाच्या सोयी-सुविधा कशा उपलब्ध करून दिल्या जातील याची काळजी घ्यायला हवी. कारण, भारताने आज बांधकाम, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात जागतिक भरारी घेतली आहे. पण क्रीडा क्षेत्रात आजही जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकलेलो नाही. आजही आपल्या आणि परदेशातील स्टेडियम्सच्या रचनेत किंवा स्पर्धेच्या आयोजनामध्ये भरपूर मोठी तफावत आढळते. केवळ क्रिकेटच नाही तर आज आपल्याकडे बॅडमिंटन, टेनिसमध्येही मातब्बर खेळाडू आहेत. अशा सर्व मातब्बर खेळाडूंना एकत्र करून त्यांचे सल्ले घेऊन त्या त्या खेळात कशा सुधारणा करता येतील यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत.
मोदी सरकारने आतापर्यंत सुरू केलेल्या योजना लाभदायक आहेत. पण त्याची पुरेशी माहिती सामान्यांपर्यंत पोहोचू शकलेली नाही. याशिवाय प्रत्येकवेळी सरकारला दोष देऊन चालणार नाही. देशात बदल घडवून आणण्याची जबाबदारी ही कोण्या एकट्याची आहे, असं मला वाटत नाही. प्रत्येकाने जबाबदारी स्विकारली की इतरांवर टीका होणार नाहीत. क्रिकेटमध्ये एखादा फटका आपली कमकुवत बाजू असेल, तर नेटमध्ये नेमक्या त्याच फटक्याचा जास्तीत जास्त सराव करून त्यावर प्रभूत्त्व मिळवता येऊ शकते. त्याचप्रमाणे प्रत्येकाने समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून सरकारने सुरू केलेल्या योजनांसाठी वैयक्तीक पातळीवर मेहनत घेतली तर नक्कीच सरकारच्या विकास योजना खऱया अर्थान यशस्वी होतील. पुढील २० वर्षात भारत फक्त क्रिकेटच नाही तर सर्व खेळांसाठीचा लोकप्रिय देश म्हणून ओळखला जावा अशी इच्छा आहे.