एप्रिल-ऑक्टो ‘१४
नव्याने सत्तारूढ झालेल्या केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणा धोरणांमुळे विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांतील विदेशी निधी ओघवरून स्पष्ट होऊ लागले आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यात थेट विदेशी गुंतवणूक २५ टक्क्यांनी उंचावून १७.३५ अब्ज डॉलर झाली आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट विदेशी गुंतवणुकीच्या प्रवासाबाबत सोमवारी नवी दिल्लीत आकडेवारी जारी केली. यानुसार गेल्या वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत यंदा थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०१३ दरम्यान देशात १३.८२ अब्ज डॉलरचा निधी भारतात या माध्यमातून आला. वार्षिक तुलनेत ही वाढ २५ टक्क्यांची आहे.
जागतिक निर्मिती केंद्र म्हणून भारताला विकसित करण्याची आव्हाने अद्याप कायम असून त्यासाठी कृती आराखडय़ाची गरज केंद्रीय मंत्र्यांनी प्रतिपादन केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केलेल्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या कार्यशाळेत निर्मला सीतारामन बोलत होत्या.
‘मेक इन इंडिया’साठी निर्मिती क्षेत्राला आवश्यक असलेल्या पायाभूत बाबींना हेरून त्यादिशेने प्रोत्साहन देण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या. नियम सुलभता आणि लालफितीतील कपात अशी पावले यापूर्वीच सरकारने त्यासाठी उचलल्याचेही त्यांनी सांगितले. सुशासनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोगही वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘मेक इन इंडिया’ कार्यशाळेसाठी सोमवारी एकाच दिवसात सुमारे १८ कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. त्यात केंद्रातील विविध २५ खात्याचे मंत्री व राज्यांनी सहभाग नोंदविला. रसायने, पेट्रोकेमिकल्स, तेल व वायू, भांडवली वस्तू, औषध निर्मिती, कौशल्यविकास आदी विषयांवर या वेळी चर्चा झाली.
थेट विदेशी गुंतवणूक १७.३५ अब्ज डॉलरवर
नव्याने सत्तारूढ झालेल्या केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणा धोरणांमुळे विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांतील विदेशी निधी ओघवरून स्पष्ट होऊ लागले आहे.
First published on: 30-12-2014 at 12:31 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fdi jumps 25 percent in april oct says nirmala sitharaman