सलग पाचव्या महिन्यात सव्वा लाख कोटींपुढे मजल
सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन (जीएसटी) १.३३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. सलग पाचव्या महिन्यात जीएसटी संकलन १.३० लाख कोटी रुपयांच्या वर कायम राहिले आहे, असे अर्थ मंत्रालयाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमधून समोर आले आहे.
फेब्रुवारी २०२२ मधील एकत्रित जीएसटी महसूल १,३३,०२६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ज्यामध्ये केंद्रीय जीएसटी महसुलाची रक्कम २४,४३५ कोटी, राज्य जीएसटीची रक्कम ३०,७७९ कोटी आणि एकात्मिक (इंटिग्रेटेड) जीएसटीची रक्कम ६७,४७१ कोटी रुपये (आयातीवर मिळालेल्या ३३,८३७ कोटी रुपयांसह), उपकर संकलनाची रक्कम १०,३४० कोटी (आयातीवर मिळालेल्या ६३८ कोटी रुपयांसह) इतकी होती, असे अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये १,१३,१४३ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. त्या तुलनेत सरलेल्या फेब्रुवारी २०२२ मधील जीएसटी संकलन १८ टक्के अधिक आहे. तर फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत महसुलामध्ये २६ टक्के वाढ नोंदण्यात आली आहे. फेब्रुवारी हा २८ दिवसांचा महिना असल्याने जानेवारीच्या तुलनेत सामान्यत: कर संकलनात घट झाली आहे, असे अर्थ मंत्रालयाने सांगितले. फेब्रुवारी महिन्यात देशभरात असलेली आंशिक टाळेबंदी, रात्रीची संचारबंदी आणि चालू वर्षांत २० जानेवारीच्या सुमारास ओमायक्रॉनचा देशात संसर्ग वाढल्याने देशातील बहुतांश राज्यांनी विविध प्रकारचे र्निबध लागू केले होते, त्याचादेखील परिणाम जीएसटी संकलनावर झाला आहे.