दोन दिवस चाललेल्या अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हच्या खुल्या बाजारातील धोरणे ठरविणाऱ्या समितीच्या (एफओएमसी) बैठकीचे फलित म्हणून सध्याच्या दरमहा ८५ अब्ज डॉलरच्या प्रोत्साहनपर रोखे खरेदीत आंशिक कपात करून ती ७५ अब्ज डॉलर करण्याचा अपेक्षित निर्णय गुरुवारी पहाटे जाहीर करण्यात आला. नववर्षांत जानेवारीपासून या निर्णयाचा अंमल सुरू होईल.
फेडचे मावळते अध्यक्ष बेन बर्नान्के यांनी सप्टेंबर महिन्यांत झालेल्या फेडच्या बैठकीनंतर दिलेल्या स्पष्ट संकेतांप्रमाणेच हा निर्णय आला असून, डिसेंबरअखेर ‘क्यूई थ्री’ अर्थात अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या प्रोत्साहनपर रोखे खरेदीला गुंडाळण्याला (टेपरिंग) सुरुवात होणार आहे. बर्नान्के यांनी तसा पुसटसा निर्देश मे २०१३ मध्ये जेव्हा केला तर जगभरात विशेषत: उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली होती. भारतासहित अनेक उदयोन्मुख देशांच्या चलनांची वेगाने घसरण झाली आणि अमेरिकी डॉलरमध्ये अकस्मात बळकटी दिसून आली.
फेडच्या यापूर्वीच्या ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या बैठकीत ‘टेपरिंग’ अर्थात रोखे खरेदीत कपातीचा निर्णय घेण्याइतपत अमेरिकेची अर्थव्यवस्था अद्याप सुदृढ बनली नसल्याबाबत सदस्यांमध्ये बहुमत दिसून आले. तथापि गेले दोन दिवस (१७ व १८ डिसेंबर) चाललेल्या बैठकीनंतर सध्याच्या ८५ अब्ज डॉलरवरून मासिक रोखे खरेदी ७५ अब्ज डॉलरवर आणण्याच्या निर्णयालाही फेडच्या मनोनित अध्यक्षा जॅनेट येलेन यांच्यासह बहुतांश सदस्यांच्या सहमतीने ठरविण्यात आले, असे बर्नान्के यांनी नंतर पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.
‘फेड’ निर्णयाला पूरकता
* अमेरिकेत नवीन घरांची वाढलेली विक्री
* ग्राहकोपयोगी वस्तूंच्या खरेदीत वाढ दर्शविणारा निर्देशांक
* बेरोजगारीचे प्रमाण उच्च असले तरी त्यात घसरण दिसून येते.
अमेरिकी अर्थव्यवस्थेत होत असलेली सुधारणा चिरस्थायी ठरते की अल्पजीवी हे समजण्यासाठी काही काळ जावा लागेल. नोव्हेंबर महिन्याचा बेरोजगारीविषयक तपशील तपासला असता अर्धवेळ कामगारांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. म्हणजे पूर्णवेळ कामगार भरती करण्याइतपत अमेरिकेच्या उद्योगजगतात विश्वासाचा अद्याप अभाव दिसून येतो.
डॉ. सौम्या कांती घोष, स्टेट बँक समूहाच्या अर्थतज्ज्ञ
‘फेड’ची आंशिक कपात
दोन दिवस चाललेल्या अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हच्या खुल्या बाजारातील धोरणे ठरविणाऱ्या समितीच्या (एफओएमसी) बैठकीचे फलित म्हणून
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-12-2013 at 08:24 IST
Web Title: Fed partial reduction