कर्ज वितरणात हात आखडता घ्यावे लागलेल्या सरकारी बँकांना योग्य ती भांडवली पर्याप्तता मिळवून देऊन ऊर्जा प्रदान करणारा महत्त्वपूर्ण निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. देशातील निवडक १० राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये यामुळे तब्बल १२,५१७ कोटी रुपयांचे भांडवल ओतले जाणार आहे. .
सार्वजनिक क्षेत्रातील या बँकांना त्यामुळे १ एप्रिल २०१३ पासून अंमलात येणाऱ्या भांडवल पर्याप्ततेच्या ‘बॅसल ३’ या जागतिक नियमनाची अंमलबजावणीही शक्य होणार आहे. बँकांमधील नव्या भांडवली स्फुरणाच्या या निर्णयाची प्रत्यक्षात पूर्तता मार्च २०१३ पर्यंत होणार असून लाभार्थी बँकेचे नाव व सहाय्य रक्कम या कालावधीत जाहीर केली जाणार आहे.
बँकांना गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारमार्फत अर्थसहाय्य केले जात आहे. गत दोन आर्थिक वर्षांत ३२,००० कोटी रुपये बँकांमध्ये ओतले गेले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांना भांडवली सहाय्य करण्याची तरतूद २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात (तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी १६ मार्च २०१२ रोजी सादर केलेल्या) करण्यात आली होती. तर आधीच्या वर्षांतही १२,००० कोटी रुपये बँकांना मिळाले होते. २०१०-११ मध्ये सरकारने २०,१५७ कोटी रुपयांची तरतूद बँकांसाठी केली होती.
दोन वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या भांडवली स्फुरणाचा लाभ म्हणून बँकांना ‘टियर १’ भांडवलाचे प्रमाण ८ टक्क्यांपर्यंत ठेवण्यास मदत झाली होती. शिवाय सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांमधील आपले भागभांडवल किमान ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या निकषानुसारही हे भांडवल ओतले आहे. आता ‘बॅसल३’च्या अंमलबजावणीसाठी नव्याने भांडवल दिले जाणार आहे. अर्थ मंत्रालयाचे हे धोरण टप्प्याटप्प्याने ३१ मार्च २०१८ पर्यंत राबविण्यात येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा