महिन्यावर येऊन ठेपलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाची उत्सुकता शिगेला असतानाच अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पपूर्व बैठकींनी वेग घेतला आहे. गुरुवारी कृषी क्षेत्रातील व्यक्ती, अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जेटली हे शुक्रवारी बडय़ा उद्योगपतींची भेट घेणार आहेत.
अर्थसंकल्पपूर्व तयारी म्हणून विविध विभागांतील व्यक्तींना अर्थमंत्री भेटत आहेत. याअंतर्गत त्यांनी गुरुवारी कृषी विभागातील अधिकारी, प्रतिनिधींशी आपल्या कार्यालयात चर्चा केली. ते आता उद्योगपती, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी यांच्याबरोबर बैठक घेतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच आठवडय़ात सर्व विभागांतील सचिवांची बैठक पार पाडली होती. मंत्रिमंडळातील आपल्या सदस्यांना पंतप्रधानांनी येत्या १०० दिवसांचा अंमलबजावणी कार्यक्रम सादर करण्यास सूत्रे हाती घेताच सांगितले. मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प जुलैच्या पहिल्या आठवडय़ात संसदेत सादर होण्याची शक्यता आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेने मार्च २०१४ अखेरच्या वर्षांत ४.७ टक्के प्रगती केली आहे. तर निर्मिती क्षेत्राची वाटचाल शून्य (०.७ टक्के) स्थितीत राहिली आहे. अडचणीत सापडलेले प्रकल्प, पायाभूत सेवा प्रकल्प मंजुरीसाठी हातावेगळे करणे हे मोदी सरकारचे प्राथमिक लक्ष्य असल्याचे सांगितले जाते. या दिशेने अर्थसंकल्पात उपाययोजना होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा