अर्थ खात्यासह कंपनी व्यवहार खात्याचाही कार्यभार हाती घेणाऱ्या अरुण जेटली यांनी लोकशाही आघाडी सरकारचे महागाई नियंत्रण आणि विकासाला प्रोत्साहन असेल, असे मंगळवारी स्पष्ट केले.
राज्यसभेचे खासदार व राज्यसभेतील विरोधी पधनेते भूषविणाऱ्या जेटली यांच्याकडे अर्थ, कंपनी व्यवहार व संरक्षण खात्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नव्या सरकारचे महागाई नियंत्रण व विकासाला चालना देण्याचे प्रयत्न असतील, असे स्पष्ट केले.
सरकारसमोर अनेक आव्हाने असून देशाने पुनर्प्रगतीवर येणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. असे करताना तुटीवर लक्ष ठेवणेही गरजेचे असून भारतीय अर्थव्यवस्थेतील गुंतवणूकपूरक वातावरण निर्माण व्हायला हवे. या दृष्टीने येणारे दोन महिने हे निर्णयांचे असतील, असेही त्यांनी सांगितले.
सरकारचे संपूर्ण धोरणच येत्या काही दिवसात स्पष्ट होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. महागाई व विकास यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
डॉ. रघुराम राजन अर्थमंत्र्यांच्या भेटीला
केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारणाऱ्या अरुण जेटली यांची मंगळवारी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी लगेच भेट घेतली. रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण येत्या आठवडय़ात येत असताना राजन यांनी अर्थमंत्र्यांशी भेटून सद्य अर्थ स्थितीबाबत चर्चा केली. महागाई नियंत्रणासाठी बँक सरकारच्या हातात हात घालून कार्य करेल, असा विश्वासही राजन यांनी भेटीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना दिला. केंद्रात भाजपाचे सरकार येण्यापूर्वीच राजन यांच्या पदाविषयी चर्चा सुरू झाली होती. माजी अर्थमंत्री पी. चिदम्बर यांच्या खास मर्जीतील राजन यांचे पद बदलण्याबाबत माध्यमांमधून उलट-सुलट मते प्रदर्शित होत होती.