पुढील तीन वर्षांचा प्रवास दाखविण्याचा सरकारचा यत्न
विकासावर खर्च करण्यात हात आखडता न घेता तसेच तरतूद करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय खर्चाची अंमलबजावणी करूनच चालू आर्थिक वर्षांसाठीचे वित्तीय धोरण राबविले जाईल, असे सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले. येत्या अर्थसंकल्पादरम्यान पुढील तीन वर्षांचा वित्तीय समायोजन आराखडा सादर केला जाईल, असेही या वेळी जाहीर करण्यात आले.
केंद्रीय अर्थव्यवहार सचिव शक्तिकांता दास यांनी सांगितले की, एकूणच वित्तीय तुटीबाबतचा आराखडाच सरकार तयार करत असून चालू आर्थिक वर्षांत चालू खात्यावरील तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात १ ते १.३ टक्केराहील. चालू आर्थिक वर्षांसाठी तसेच आगामी काही कालावधीसाठींचा आराखडा तयार करण्यात येईल, असे नमूद करीत दास यांनी भारतासाठी सध्या चालू खात्यातील तूट नियंत्रणात आहे, ही जमेची बाजू असल्याचे नमूद केले.
२०१६-१७ चा अर्थसंकल्प येत्या २९ फेब्रुवारीला सादर करण्याची घोषणा केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी गुरुवारी केली होती. त्याचबरोबर येत्या तीन वर्षांच्या आर्थिक उपाययोजनांचा ठोस आढावाच सरकार संसदेत अर्थसंकल्पाच्या माध्यमातून घेऊन येईल, असेही सिन्हा म्हणाले होते.
नजीकच्या दिवसात नव्या आर्थिक उपाययोजनांकरिता सरकार पुढाकार घेईल, असे स्पष्ट करीत दास यांनी थेट विदेशी गुंतवणुकीसाठी आणखी काही क्षेत्र खुली करण्याचे संकेत या वेळी दिले. वित्तीय तुटीचे उद्दिष्ट राखण्याचे सरकारचे प्रयत्न चालू तसेच पुढील आर्थिक वर्षांतही सुरू राहतील, असेही ते म्हणाले.
रुपयातील घसरणीवर सरकारचे लक्ष – दास
डॉलरसमोरील रुपयाच्या घसरणीकडे लक्ष असून यामुळे चालू खात्यावरील तूट वाढणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले. केंद्रीय अर्थव्यवहार सचिव शक्तिकांता दास यांनी सांगितले की, परकी चलन विनियम व्यासपीठावरील रुपयाच्या हालचालीकडे सरकार तसेच रिझव्र्ह बँकेचे लक्ष असून त्यामुळे चालू खात्यातील तूट वाढेल, असे वाटत नाही. डॉलरसमोर केवळ रुपयाच नव्हे तर अन्य देशांची इतर काही चलनेही कमकुवत होत असल्याचे समर्थनही दास यांनी केले.