वाणिज्य बँकांकडील कर्जथकिताच्या वाढत असलेल्या डोंगरात सर्वाधिक वाटा हा बांधकाम व स्थावर मालमत्ता उद्योगक्षेत्राचा असला आणि सध्याच्या खडतर आर्थिक वातावरणात अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांना कर्जफेड जिकिरीची बनली आहे, अशी वस्तुस्थिती असली तरी विशेषत: मागणीचा जोर कायम असलेल्या मुंबईतील बांधकाम उद्योगासाठी वित्तपुरवठय़ाची चणचण असल्याचे दिसून येत नाही. मुंबईच्या बांधकाम विश्वातील दोन बडे समूह गोदरेज आणि पिरामल यांनी वित्त ओघ सुरू राहील असे नवे स्रोत अजमावण्याचे ठरविले आणि त्यात यशही कमावले आहे.
पिरामल एंटरप्राइजेसचा एक भाग असलेल्या ‘इंडिया रेंट’ या वित्तीय गुंतवणूक सल्लागार संस्थेच्या ३०० कोटींची भांडवल उभारणीचा गुंतवणूकदारांच्या दांडग्या प्रतिसादाने तीन दिवसांतच भरणा झाल्याने नियोजित मुदतीआधीच ही योजना गुंतवणुकीसाठी बंद करण्याचे गुरुवारी घोषित केले.
‘स्कीम फाइव्ह’ ही पाच वर्षे कालावधीची मुदतबंद (क्लोज्ड एंडेड) साहसी गुंतवणूक योजना असून देशांतर्गत बांधकाम प्रकल्पात गुंतवणुकीचे उद्दिष्ट असलेल्या या साखळीतील ही सहावी मालिका आहे. या मालिकेअंतर्गत आजवर १००० कोटींची उभारणी झाली आहे. ‘इंडियारेंट’ ही वित्तीय गुंतवणूक सल्लागार संस्था रु. ४३४३ कोटींच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन पाहते. या आधी ‘मुंबई रिडेव्हलपमेंट फंड’ या योजनेंतर्गत ५०० कोटींचा निधी तिने उभारला असून, मुंबईतील बांधकाम उद्योगात हा निधी गुंतविला जाणार आहे. यातील ५०% निधी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतलेल्या कंपन्यांना वित्तपुरवठय़ासाठी वापरात येणार आहे.
नुकत्याच मुदतपूर्ती झालेल्या पाच वर्षे कालावधीच्या इंडियारेंटच्या विद्यमान योजनेतून गुंतवणूकदारांना ४५% चक्रवाढ दराने परतावा मिळाला आहे. ‘आमच्यावर असलेला गुंतवणूकदारांचा विश्वास यातून दिसून येतो. व्यावसायिक व्यवस्थापन आणि पारदर्शी कारभार याला दिलेली ही दाद आहे,’ असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक खुश्रू जीजीना यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
रु. ३२५ दराने हक्कभाग विक्री
गोदरेज उद्योग समूहाचा भाग असलेल्या व गृहबांधणी क्षेत्रात कार्यरत असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीजने भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे हक्कभाग विक्रीसाठी परवानगी मागणारा आपला अर्ज सादर केला. सेबीकडे सादर केलेल्या रेड हेिरग प्रोस्पेक्टस्नुसार २.१५ कोटी समभाग प्रत्येकी रु. ३२५ भावाने सध्याच्या भागधारकांना विकण्याचे प्रस्तावित केले आहे. सद्य बाजारभाव रु. ४७५ (६ ऑगस्ट रोजी) च्या तुलनेत सुमारे ३० टक्के सवलतीने ही हक्कभाग विक्री होत आहे.
सध्याच्या भागधारकांकडे असलेल्या प्रत्येक २९ समभागांमागे त्यांना या प्रस्तावित हक्कभाग विक्रीत आठ समभाग हक्क तत्त्वाने खरेदी करता येणार आहेत. या विक्रीतून गोदरेज प्रॉपर्टीजने रु. ६९९.९९ कोटींचे भांडवल उभे करणे अपेक्षित आहे. २००९ मध्ये शेअर बाजारात नोंदणी झाल्यापासून ही कंपनीची पहिलीच हक्कभाग विक्री आहे. या विक्रीतून उभारलेल्या भांडवलातून कंपनी ५२५ कोटींची कर्जफेड करणार आहे, तर उर्वरित रक्कम नव्या प्रकल्पांसाठी वापरणार आहे. सध्या कंपनी एकूण आठ कोटी चौरस फुटांचे प्रकल्प विविध १२ शहरांतून राबवीत आहे. गोदरेज प्रॉपर्टीजचा समभाग गुरुवारी ३.३ टक्क्यांनी घसरून रु. ४४५.६० वर बंद झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा