अलीकडच्या काही महिन्यातील लक्षणीय कलाटणी, चालू खात्यावरील घटलेली तूट, नव्या सरकारने राबविलेल्या प्रमुख आर्थिक सुधारणा पाहता, देशाच्या अर्थव्यवस्थेचे भवितव्य ‘खूपच उजळ’ असेल, असे प्रतिपादन देशाचे नवीन आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.
गेल्या वर्षी जुलैमध्ये देश भयानक आर्थिक संकटाच्या उंबरठय़ावर होता. पण त्यानंतर १६ महिन्यांत चित्र खूपच बदलले, तर अलीकडच्या काही महिने तर कलाटणीचेच म्हणता येतील, अशा शब्दात सुब्रह्मण्यन यांनी नव्या सरकारच्या कर्तृत्वाचे कौतुक केले. चालू खात्यावरील तूट आता नियंत्रित पातळीवर आहे. आयातीत जिनसांच्या आंतरराष्ट्रीय किमती घसरणे भारताच्या पथ्यावर पडले आहे. जगाच्या संदर्भात तर भारतातील हे चित्र ‘अतिविशेष’ धाटणीचेच आहे, असे सुब्रह्मण्यन यांनी जागतिक बँकेने मंगळवारीच भारत वगळता अन्य सर्व देशांबद्दल खालावत नेलेल्या कयासांचा उल्लेख करीत सांगितले. रग्गड रोख गंगाजळी असलेल्या सार्वजनिक उपक्रमांची भारताच्या आगामी आर्थिक उन्नतीत मोठे योगदान राहील, असेही त्यांनी सूचित केले. या निधीचा वापर त्यांनी अधिकाधिक गुंतवणुकीसाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Story img Loader