दुधाचा पेला अर्धा भरलेला आहे किंवा अर्धा रिकामा आहे, असे समजायचे हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे हे आपणास माहीत आहेच. त्याचप्रमाणे १२२ कोटी लोकसंख्येच्या देशात फक्त दोन कोटी १५ लाख डिमॅट खाती म्हणजेच पर्यायाने शेअर बाजारात गुंतवणूक करणारे लोक आहेत म्हणून खेद व्यक्त करीत राहायचा की ही संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे म्हणून आनंद व्यक्त करायचा हे आपण ठरवावे. अगदी आकडेवारी द्यायची झाली तर सन १९९९ साली सीडीएसएलमध्ये एक लाखाहून कमी डिमॅट खाती होती त्याची संख्या लवकरच सुमारे ९० लाखांच्या आसपास पोहोचेल. हे चित्र नक्कीच आशादायक आहे. कारण वाढत्या महागाईला तोंड द्यायला बँकेतील मुदत ठेवी पुरेशा नाहीत तर इतर पर्याय शोधणे आवश्यक आहे हे लोकांना पटत आहे.
‘बँकेत मुदत ठेव की त्या बँकेचे शेअर्स’ असा एक लेख याच स्तंभात मागे लिहिला होता. शेअर बाजाराची कार्यप्रणाली पारदर्शक आहे आणि योग्य माहिती करून घेऊन व्यवहार केले तर फसवणूक व्हायची शक्यता नाही हेही लोकांना पटू लागले आहे. महाराष्ट्र सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाच्या आदेशानुसार अनेक वाचनालयांनी पुढाकार घेऊन ‘आíथक साक्षरता आणि शेअर बाजार’ या विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करायला सुरुवात केली आहे. दापोली कृषी विद्यापीठ, वसई येथील हेडगेवार नगर परिषद वाचनालय, गोरेगावचे प्रबोधन वाचनालय, भांडुपमधील विजय क्रीडा मंडळाचे वाचनालय, साताऱ्यातील नगर वाचनालय, वाशीमधील मराठी साहित्य मंडळाचे वाचनालय इतकेच नाही तर कोकणातील आचरा येथील रामेश्वर वाचनालयाने देखील आपल्या वाचकांसाठी तसेच सर्व जनतेसाठी व्याख्यानांसाठीच्या तारखा निश्चित केल्या आहेत. नुकतेच पुणे येथे एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला. ‘लोकसत्ता’ची वाचक असलेली अनेक मंडळी तिथे उपस्थित असल्याने मोकळ्या वेळात आíथक गप्पांची मफल जमली! आíथक म्हणजेच शेअर बाजार हे ओघानेच आले. एक छोटासा आíथक साक्षरता मेळावाच म्हणा ना! यासाठी पुढाकार घेणारे एक वऱ्हाडी सुमीत सबनीस. एक बलाढय़ भारतीय उद्योगपतीच्या खासगी विमानाचे सारथ्य करणारे एक निष्णात वैमानिक ही त्यांची ओळख. गप्पांच्या सुरुवातीलाच मी त्यांना प्रश्न विचारला की, इतकी महत्त्वाची व्यक्ती जेव्हा विमानात बसलेली असते तेव्हा त्याची सुरक्षितता केवळ तुमच्या हातात असते तर मग या दृष्टीने विमान चालवताना काही तणाव जाणवत नाही का? यावर त्यांनी दिलेले उत्तर मार्मिक होते. ते म्हणतात की माणसाला सर्वात प्रिय बाब म्हणजे आपला जीव! माझा जीव सुरक्षित राहिला पाहिजे हे ध्यानात ठेवून मी विमान उडवीत असतो व त्याच्या अनुषंगाने सर्व काळजी घेत असतो. म्हणजे मग आपोआपच इतर लोकांच्या जिवाची काळजी घेतली जातेच ना! लाजबाब उत्तर. तेच सूत्र धरून मी सर्वाना म्हटले की, गुंतवणूक करताना हे माझे कष्टाचे पसे आहेत ते मी कुणा लुंग्या-सुंग्याच्या हातात देणार नाही तसेच असुरक्षित अशा प्रकारे गुंतवणार नाही, त्याची कार्यपद्धती जाणून घेऊन मगच व्यवहार करीन इतकी काळजी घेतली तर मग फसवणूक होईलच कशी?
शेअर बाजारात का गुंतवणूक करावी याचे उत्तर उपस्थित महिलांकडूनच वदवून घेतले. सौ. पल्लवी यांनी सोन्याचा विषय काढला. उदाहरणच घ्यायचे तर १० तोळे सोने घेऊन त्याचे दागिने बनवून आपण घेतो. दोन-तीन वष्रे झाली की ‘फॅशन जुनी झाली’ म्हणून ते मोडून परत नव्याने करून घेतो. मोडतेवेळी सुवर्णकार सुमारे १० टक्के घट धरतोच. परत नव्याने घडणावळ द्यावी लागते ती वेगळीच. ही १० टक्के तूट भरून काढायला परत नव्याने सोने घ्यायला लागते ते मात्र प्रचलित भावाने! आता ‘घडणावळ’ म्हणजे काय असा स्वाभाविक प्रश्न सौ. सुमा शेटेंचा! इंग्रजी माध्यमाचे हे परिणाम!! ‘घडणावळ’ म्हणजे मराठीत आपण त्याला मेकिंग चार्ज म्हणतो ना तोच -इति मेधा वहिनी. बरे वेळप्रसंगी दागिने विकून पसे उभे करता येतात असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल, कारण सहसा कुणी दागिने विकायचे धाडस करीत नाही कारण प्रतिष्ठेचा प्रश्न असतो तो. तर असे हे सोने खरेदी करण्यासाठी आपण आपल्या सरकारचे करोडो रुपयांचे परकीय चलन खर्च करायला भाग पाडीत असतो. जणू काही सोने म्हणजे जीवनावश्यक वस्तूच. तस्मात सोने आणि त्याचे दागिने या फंदात न पडता ते पसे एखाद्या उद्योगात गुंतवले तर उद्योग उभा राहील आणि दहा-पंचवीस जणांना रोजगार देईल! कुणी एखादा खासगी उद्योग करीत असेल किंवा एखादी कंपनी उभी राहात असेल किंवा एखाद्या प्रचलित कंपनीच्या भांडवलात आपण सहभागी होत असू म्हणजेच त्या कंपनीचे शेअर्स घेत असू. इतका हा सरळ व्यवहार आहे. सोने आणि डिझेल/ पेट्रोल यावर खर्च होणारा परकीय चलनाचा आकडा डोळे पांढरे करणारा आहे. अलकाताईंच्या मुलाला हे सर्व ऐकून एक अफलातून कल्पना सुचली. तो म्हणाला की, गेल्या वर्षी मी मोबाइल घेतला होता त्यात अमुक एक सोय नव्हती म्हणून मी १६ हजारांचा नवीन मोबाइल घ्यायचा विचार करीत होतो. तो विचार रहीत करून ते १६ हजार रुपये मी शेअर्समध्ये गुंतविले तर? अतिशय स्तुत्य निर्णय आहे तुझा असे म्हणून मी त्याला इंटरनेटवर जाऊन अशा चांगल्या कंपनी कोणत्या हे कसे पाहायचे त्याच्या जुजबी सूचना दिल्या. मात्र इथेच न थांबता ‘‘दर महिन्याला तुला जो पॉकेटमनी मिळतो त्यातील काही भाग नियमितपणे शेअर्स घेण्यासाठी खर्च कर,’’ असेही सांगायला मी विसरलो नाही.
आर्थिक साक्षरता चोहीकडे!
दुधाचा पेला अर्धा भरलेला आहे किंवा अर्धा रिकामा आहे, असे समजायचे हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे हे आपणास माहीत आहेच.
आणखी वाचा
First published on: 20-12-2013 at 08:21 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Financial literacy