पीटीआय, नवी दिल्ली : वस्तू व सेवांच्या दरवाढीसह, त्यांची बळावलेली मागणी आणि व्यापाऱ्यांकडून वाढलेले कर-अनुपालन याच्या एकत्रित परिणामामुळे सप्टेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलन हे १.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याची आशा सरकारने बुधवारी व्यक्त केली. चालू वर्षांत मार्च महिन्यापासून जीएसटी संकलन १.४० लाख कोटींपेक्षा अधिक राहिले आहे. येत्या शनिवारी, १ ऑक्टोबरला सरकारकडून जीएसटी संकलनाची अधिकृत माहिती जाहीर केली जाईल.
सरकारला आगामी सणासुदीचा काळ बघता, कर संकलनात सुरू असलेली वाढ अधिक आश्वासक वाटते. आधीच्या महिन्यांत म्हणजे ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन हे १.४३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यायोगे १.१७ लाख कोटी रुपये जमा झाले होते. चालू आर्थिक वर्ष म्हणजेच २०२२-२३ मध्ये केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून सुमारे १.५५ लाख कोटी रुपये सरासरी वार्षिक महसूल अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून ७.४५ लाख कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. एप्रिलमध्ये सर्वाधिक १.६८ लाख कोटींचा विक्रमी महसूल मिळाला होता.