आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा उसळलेल्या खनिज तेल दराने गुरुवारी भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. यामुळे गेल्या सलग तीन व्यवहारांपासून घसरत असलेल्या निर्देशांक घसरणीला पायबंद बसला. जवळपास शतकाहून अधिक ११५.११ अंश वाढीने सेन्सेक्स २४,३३८.४३ वर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४२.२० अंश वाढ नोंदली गेल्याने निर्देशांक ७,४०४ वर बंद झाला. गेल्या तीन व्यवहारात मुंबई निर्देशांकाने ६४७.३७ अंशांची घसरण नोंदविली आहे. गुरुवारी मात्र वाढत्या तेल दराबरोबरच अमेरिकी फेडरल रिझव्र्हमार्फत व्याजदर वाढीच्या आशेवर बाजारात तेजीचे व्यवहार झाले.
संसदेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम जाहीर होण्याबरोबरच वस्तू व सेवा कर तसेच बँक दिवाळखोरविषयक विधेयके संसदेच्या येणाऱ्या अधिवेशनात पारित होतील, असा विश्वास सरकार पातळीवर व्यक्त केल्यानेही बाजाराला भरते आले. मुंबई निर्देशांकाचा गुरुवारचा प्रवास २४,५१४.०१ पुढे गेला, तर निफ्टीला त्याचा ७,४०० पुढील प्रवास पुन्हा नोंदविता आला.

Story img Loader