भारतीय हवाई क्षेत्रात पुन्हा पंख पसरविण्यासाठी टाटा सन्सला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. एअर आशियाबरोबरच्या प्रवासी वाहतूक भागीदारीसाठीचा प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाने पारित केला आहे.
मलेशियाच्या एअर आशियाने टाटा सन्सबरोबर भारतीय हवाई वाहतूक सेवेसाठी उत्सुकता दाखविल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला होता. कंपनी मेपासून निवडक निमशहरांमध्ये देशांतर्गत उड्डाणे सुरू करेल.
नव्या व्यवसायात सुरुवातील ८० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक ४९ टक्के हिस्सा एअर आशियाचा, ३० टक्के टाटा सन्सचा तर उर्वरित २१ टक्के भागीदारी टेलिस्ट्रा ट्रेडप्लेसची आहे.
थायलंड आणि मलेशिया कार्यक्षेत्र असलेल्या एअर आशियाची सध्या भारतातील चेन्नई, बंगळुरू, कोची, तिरुचिरापल्ली आणि कोलकत्ता येथून विविध २० देशांमध्ये उड्डाणे होतात.
नवी कंपनी आपल्या निवडक ३ ते ४ विमानांद्वारे देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हवाई जाळे विणेल. कंपनीचे मुख्यालय चेन्नई येथेच राहणार आहे. भारताबाहेर उड्डाणे करण्यासाठी एअर आशियाला देशात पाच वर्षे व्यवसाय बंधनकारक आहे.
टाटा समूहाचे जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये (टाटा एअरलाईन्स) भारतीय हवाई वाहतूक कंपनी सुरू केली होती. दोन दशकानंतर तिचे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया असे नामकरण झाले.
‘जेट-इतिहाद’ने अग्रक्रम गमावला !
सरकारने जेट एअरवेज-इतिहादच्या विदेशी गुंतवणूक विचारालाही सहमती दर्शविली आहे. मात्र उभयतांमार्फत अद्याप त्याबाबत ठोस आराखडा सरकारला सादर करण्यात आलेला नाही. मालकी हिश्यावरून हा प्रस्ताव सध्या अधांतरीच आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये भारतीय हवाई क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्यानंतर एअर आशिया – टाटा सन्सच्या माध्यमातून या क्षेत्रातील पहिली विदेशी गुंतवणूक वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.