नवी दिल्ली : जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्ज’ने चालू आर्थिक वर्षांसाठी भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीसंबंधी अंदाज सुधारून घेत, तो ७ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. वाढती महागाई आणि महागाई नियंत्रणासाठी मध्यवर्ती बँकेकडून करण्यात येत असलेल्या व्याजदरातील वाढीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाची गती मंदावणार असल्याचे ‘फिच’ने गुरुवारी हा सुधारित अंदाज वर्तवताना स्पष्ट केले.
चालू आर्थिक वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के वेगाने वाढेल, असा ‘फिच’ने जूनमध्ये अंदाज वर्तविला होता. तसेच पुढील आर्थिक वर्षांसाठी भारताच्या विकासदराचे अनुमान ७.४ टक्क्यांवरून कमी करत ते तिने ६.७ टक्क्यापर्यंत खाली आणले आहे. चालू आर्थिक वर्षांत एप्रिल ते जून तिमाहीतील भारताचा विकासदर १३.५ टक्क्यांवर राहिला. प्रत्यक्षात तो १८.५ टक्के राहण्याचे ‘फिच’चे भाकीत होते.
हेही वाचा >>> Vedanta Foxconn पंतप्रधान मोदींनी गैरपद्धतीने वेदान्त-फॉक्सकॉन गुजरातला नेला; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
जागतिक अर्थस्थितीचा भविष्यवेध घेणाऱ्या गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून करण्यात येत असलेल्या आक्रमक व्याज दरवाढीमुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमती १०० डॉलर प्रतििपपाखाली आल्या असल्या तरीही अन्नधान्याच्या हंगामावर विपरीत परिणाम होण्याच्या भीतीने खाद्यान्न महागाईचा धोका अजूनही कायम आहे. सरलेल्या महिन्यात (ऑगस्ट २०२२) घाऊक महागाईचा दर १२.४१ अशा ११ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला असला तरीही ग्राहक किंमत निर्देशांकावरील आधारित किरकोळ महागाईचा दर सात टक्क्यांवर कायम आहे.
एप्रिल ते जून तिमाहीत विकासदर १३.५ टक्के असा अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने इतर पतमानांकन संस्थांप्रमाणे ‘फिच रेटिंग्ज’ने वार्षिक विकासदराच्या अंदाजात कपात केली आहे. मूडीजने २०२२ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ८.८ टक्के वेगाने वाढेल असा अंदाज वर्तविला होता. त्यानंतर मात्र २०२२ मध्ये तो ७.७ टक्क्यांवर आणि २०२३ मध्ये आणखी घसरून ५.२ टक्क्यांवर जाण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ‘सिटीग्रुप’ने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये वाढीचा अंदाज आधीच्या ८ टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. तर ‘गोल्डमन सॅक्स’ने तो ७.२ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर सुधारला आहे.
जागतिक मंदीचे संकेत
युरोपातील म्हणजेच युरोझोनमधील देश आणि संयुक्त अरब अमिराती चालू वर्षांच्या शेवटी मंदीत प्रवेश करतील आणि जगातील आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला पुढील वर्षांच्या मध्यावर सौम्य मंदीचा सामना करावा लागेल, असे ‘फिच रेटिंग्ज’चे अनुमान आहे. चीनमध्ये करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लादलेले निर्बंध आणि बांधकाम क्षेत्रातील संकटामुळे फेरउभारी मर्यादित प्रमाणात राहणार आहे. चालू वर्षांत चीनचा विकासदर २.८ टक्क्यांपर्यंत कमी होईल आणि पुढील वर्षी तो केवळ ४.५ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहण्याचा तिचा कयास आहे.