ई-कॉमर्स क्षेत्रातील एकमेकांच्या कट्टर स्पर्धक फ्लिपकार्ट व मिन्त्रा या एकत्र होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. येत्या पंधरवडय़ात याबाबतचा अंतिम निकाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ई-कॉमर्स क्षेत्रातील दोन स्पर्धक कंपन्यांचे हे एकत्र येणे म्हणजे ३०० कोटी रुपयांच्या व्यवहाराची पूर्तता मानले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाढीव तोटय़ाचा सामना करणाऱ्या फ्लिपकार्टने मोठय़ा प्रमाणात निधी उभारणीचाही प्रयत्न चालविला आहे. वर्षभरात १ अब्ज डॉलरची ई-कॉमर्स कंपनी होण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हा व्यवहार लाभदायक ठरू शकतो.
उभय कंपन्यांतील एस्सेल पार्टनर्स व टायगर ग्लोबल हे सामायिक गुंतवणूकदारच हे विलीनीकरणासाठी पुढाकार घेत आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या फ्लिपकार्टचे अस्तित्व सध्या तयार वस्त्र प्रावरणे क्षेत्रात किरकोळ आहे. ते वृद्धिंगत करण्यासाठी या विलीनीकरणाचा लाभ होऊ शकतो. मिन्त्राच्या व्यासपीठावर याच वस्तू खरेदी-विक्रीचे व्यवहार सर्वाधिक होतात.
फ्लिपकार्टने ५४ कोटी डॉलर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून उभारले आहेत. यासाठी एस्सेल, टायगरसह ड्रॅगोनीर इन्व्हेस्टमेन्ट ग्रुप, मॉर्गन स्टॅन्ले इन्व्हेस्टमेन्ट मॅनेजमेन्ट यांनीही माहिती तंत्रज्ञानाच्या व्यासपीठावर वस्तूंच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या कंपनीत आर्थिक योगदान दिले आहे. जुलैमध्ये २० कोटी डॉलर जमा केल्यानंतर कंपनीने ऑक्टोबरमध्येही १६ कोटी डॉलरची रक्कम उभी केली होती. भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात फ्लिपकार्टला ईबे, स्नॅपडिल, अ‍ॅमेझोनसह अनेक मोठय़ा-छोटय़ा संकेतस्थळ कंपन्यांचा सामना करावा लागत आहे.