सव्वाशे वर्षांहून अधिक जुना मुंबई शेअर बाजार आणि भारतीय कॉर्पोरेट जगतासाठीचा महत्त्वाचा राष्ट्रीय शेअर बाजार यांना कट्टर स्पर्धक बनू पाहणाऱ्या एमसीएक्स-एसएक्सचे शेअर व वायदे व्यवहार अखेर ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. देशाचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या उपस्थितीत येत्या ९ फेब्रुवारी रोजी या नव्या शेअर बाजाराचे औपचारिक उद्घाटन होईल. सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा हेही यावेळी उपस्थित असतील. रोख इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह या प्रकारातील प्रत्यक्ष सौद्यांना फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवडय़ात प्रारंभ होईल. ‘फायनान्शियल टेक्नॉलॉजीज’ पुरस्कृत एमसीएक्स-एसएक्स (मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज-स्टॉक एक्स्चेंज) सध्या चलन तसेच धातू वायदे व्यवहारात आघाडीवर आहे. त्याची भांडवली बाजारात उतरण्याची तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू होती. या बाजारातील व्यवहारांसाठी सेबीद्वारे मान्यता मिळालेल्या अर्जदारांची संख्या २७० झाली आहे. एकूण ४९६ अर्ज या बाजारामार्फत दाखल करण्यात आले होते. लवकरच ३५० सदस्यांची संख्या ओलांडण्याचा विश्वास एमसीएक्स-एसएक्सने व्यक्त केला आहे. सुरुवात होण्याआधीच या बाजाराकडे सदस्यत्वासाठी दाखल झालेले ७०० अर्ज हा एक विक्रम ठरला आहे. या दरम्यान नोव्हेंबरमध्ये या बाजाराने चाचणीचे व्यवहारही पूर्ण केले आहेत.
‘राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्किम’चा शुभारंभही मुंबईतूनच
भांडवली बाजारात पहिल्यांदाच प्रवेश करणाऱ्यांसाठी प्रोत्साहक ‘राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्किम’चा शुभारंभही केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या मुंबईतील उपस्थितीत होणार आहे. तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात या योजनेचे सूतोवाच केले होते. या व्यासपीठाद्वारे गुंतवणूकदारांना कर-लाभही दिला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा