फोक्सवॉगन, जीपचा स्थानिक निर्मितीवर भर
पंतप्रधानांची संकल्पना असलेल्या ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न येत्या आठवडय़ात मुंबईत होणाऱ्या ‘मेक इन इंडिया सप्ताहा’द्वारे होणार असतानाच पूरक वातावरणात सहभागी होण्याचा मानस अनेक कंपन्यांनी राजधानीनजीक आयोजित करण्यात आलेल्या वाहन प्रदर्शनाच्या निमित्ताने व्यक्त केला आहे.
प्रदूषण चाचणीवरून चर्चेत आलेल्या फोक्सव्ॉगनने प्रदर्शनात लागोपाठ एव्हिओ, पॅसट जीटीई, टिग्यू वाहने सादर केल्यानंतर भारतीय बाजारपेठेतील कंपनीचा हिस्सा वाढविण्यासह येथून तयार होणाऱ्या वाहनांची अधिकाधिक निर्यात करण्याचा मनोदय व्यक्त केला. चालू वर्षांतील नव्या चार वाहनांच्या जोरावर कंपनी अमेरिकेनंतर भारत ही मोठी बाजारपेठ म्हणून भर देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
‘सिआम’ने आयोजित केलेल्या वाहन प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी ग्रेटर नॉएडा येथे झाले. या वेळी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते हे उपस्थित होते.
बिकट मार्गावरून वाटचाल करण्यात आघाडीची नाममुद्रा असलेल्या जीपने २०१६ व २०१७ ही कंपनीसाठी महत्त्वाची असल्याचे नमूद केले. बेसिक जीप व्हर्जन व चेरोकी ही प्रीमियम गटातील एसयूव्ही वाहन सादर करीत देशातील पसंतीच्या एसयूव्ही गटात जागा मिळविण्याचे जाहीर केले. चालू वर्षांत कंपनीची वाहने येथे उपलब्ध करून दिल्यानंतर २०१७ पासून भारतात या वाहनांची पूर्णत: निर्मिती करण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले.
मारुती सुझुकी :
विशेष करून शहरी भागासाठी कॉम्पॅक्ट श्रेणीतील इग्निस हे नवे वाहन मारुती सुझुकीने गुरुवारी वाहन प्रदर्शनात सादर केले. कंपनी ह्य़ुंदाईच्या क्रेटा, फोर्डच्या इकोस्पोर्ट, रेनोच्या डस्टरला स्पर्धा निर्माण करणारे बोलेनो ब्रेझा हे पहिले कंपनीच्या ताफ्यातील पहिले कॉम्पॅक्ट एसयूव्ही बुधवारीच सादर केले होते. याचबरोबर कंपनीने बोलेनो नाममुद्रेंतर्गतच आरएस ही स्पोर्ट हॅचबॅक लवकरच बाजारात आणण्याची घोषणाही केली.
महिंद्र अॅण्ड महिंद्र :
पहिल्या दिवशी रेसिंग आणि दुचाकी श्रेणीतील वाहने सादर केल्यानंतर महिंद्र अॅण्ड महिंद्रने गुरुवारी एक्सयूव्ही श्रेणीतील एरो आणि तिची कोरियन नाममुद्रा सॅन्गयाँगची टिव्होली ही लक्झरी एसयूव्ही सादर केली. त्याचबरोबर विजेरी ई२० (पूर्वीची रेवा) स्पोर्ट्स आणि अवजड वाहन प्रकारातील ब्लॅझो ही वाहनेही सादर केली.
वाणिज्य वाहनांची विक्री रोडावत असताना समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी या क्षेत्रातील येत्या काळात ५ टक्के बाजारहिश्श्याचे लक्ष्य जाहीर केले.
निस्सान :
निस्सानने तिच्या जीटी-आर आणि हायब्रिड एक्स-ट्रेल या प्रीमियम एसयूव्हीकरिता अभिनेता जॉन अब्राहमला राजदूत केले. निस्सानची सहभागीदार कंपनी रेनोचा रणबीर कपूर राजदूत आहे. जॉन सध्या आघाडीच्या दुचाकी निर्माती यामाहा इंडियाचाही राजदूत आहे. निस्सानने भारतीय वाहन विक्री क्षेत्रात येत्या २०२० पर्यंत ५ टक्के बाजारहिश्श्याचे लक्ष्य राखले आहे.
फियाट :
फियाट क्रिसलरने तिची पुंटो ही हॅचबॅक श्रेणीतील नवी पुअर ही कार सादर केली. तिची किंमत ५.४९ लाख रुपये आहे. कंपनीने सेदान श्रेणीतील नवी लिनियाही सादर केली. क्रॉस श्रेणीतील अव्हेच्युरा अर्बनही या वेळी दाखविण्यात आली.
‘मेक इन इंडिया’ सुराला विदेशी वाहन कंपन्यांची साथ
‘सिआम’ने आयोजित केलेल्या वाहन प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी ग्रेटर नॉएडा येथे झाले.
Written by वीरेंद्र तळेगावकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-02-2016 at 05:51 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign auto companies help in make in india