विदेशातून येणारा पैसा हाच आपल्या शेअर बाजारांची खरी चालकशक्ती आहे, हे सर्वश्रुतच आहे, पण काही समभागांचे भाग्य बदलून त्यांना अडगळीत लोटण्याचे कामही या डॉलर-पौंडांनी केले आहे. कधी काळी शेअर निर्देशांकातील तेजीचे प्रमुख हस्तक मानले गेलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस या समभागांच्या सध्याच्या रया गेलेल्या स्थितीतून हेच दर्शविले जाते.
विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी रिलायन्स आणि इन्फोसिसच्या समभागांकडे पाठ फिरविली असल्याचे उपलब्ध आकडेवारीतून दिसून येते. गेल्या दोन आर्थिक वर्षांत रिलायन्समधील विदेशी
गुंतवणूकदारांचा हिस्सा जरी आहे त्याच १७.७ टक्के पातळीवर कायम असला तरी, एकूण १९१ विदेशी गुंतवणूकदारांनी या समभागातून काढता पाय घेतल्याचे दिसून येते. शेअर बाजारांकडे उपलब्ध माहितीवरून रिलायन्सच्या समभागात गुंतवणूक करणाऱ्या विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (एफआयआय) संख्या मार्च २०११ अखेर विक्रमी अशा १,२७६ पातळीवर होती ती ३१ मार्च २०१३ पर्यंत १,०८५ वर रोडावली आहे. हीच गत इन्फोसिस, टाटा स्टील आणि हिंडाल्को या अन्य आघाडीच्या समभागांबाबत झालेली दिसून येते. इन्फोसिसबाबत भ्रमनिरास झालेल्या एफआयआयची संख्या १८९ इतकी आहे.
सामान्यत: ‘एफआयआय’ अर्थात विदेशातून गुंतवणुकीत वाढ अथवा घट होण्याचे थेट पडसाद त्या समभागाच्या मूल्यावर झालेले स्पष्टपणे दिसून येतात. गेल्या दोन वर्षांचा आढावा घ्यायचा झाल्यास, ‘सेन्सेक्स’ हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निर्धारित करणाऱ्या आघाडीच्या ३० कंपन्यांच्या समभागांपैकी केवळ आठ कंपन्यांमध्ये एफआयआयची गुंतवणूक घटली आहे. तर १५ कंपन्या अशा आहेत ज्यांच्या समभागांमध्ये किमान १०० हून अधिक एफआयआयकडून या काळात वाढीव गुंतवणूक झाली आहे.
ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील अग्रणी ‘आयटीसी’ने गत दोन आर्थिक वर्षांत सर्वाधिक ३३६ एफआयआयना आपल्या समभागात गुंतवणुकीसाठी आकर्षित केले आहे. त्या खालोखाल सन फार्माने ३१६ तर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात इन्फोसिसला पिछाडीवर टाकून अग्रस्थान मिळविणाऱ्या टीसीएसने २४३ विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे.
आजच्या घडीला शेअर बाजारांकडे नोंदणीकृत असलेल्या ‘एफआयआय’चा आकडा १,७६७ इतका आहे.
विदेशी गुंतवणूकदारांची रिलायन्स-इन्फोसिसकडे पाठ
विदेशातून येणारा पैसा हाच आपल्या शेअर बाजारांची खरी चालकशक्ती आहे, हे सर्वश्रुतच आहे, पण काही समभागांचे भाग्य बदलून त्यांना अडगळीत लोटण्याचे कामही या डॉलर-पौंडांनी केले आहे. कधी काळी शेअर निर्देशांकातील तेजीचे प्रमुख हस्तक मानले गेलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस या समभागांच्या सध्याच्या रया गेलेल्या स्थितीतून हेच दर्शविले जाते.
First published on: 03-05-2013 at 01:12 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign investor not interested to invest in reliance and infosys