भारतात अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठीच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाला एक प्रकारे सुरुंगच लागला आहे. येथील वातावरण व्यवसायपूरक नसल्याचा हवाला देत दोन विदेशी कंपन्यांनी काढता पाय घेतला आहे. यामध्ये न्यायालयाच्या कचाटय़ात सापडलेल्या शिओमी मोबाईल व तैवानस्थित मोबाईल उपकरण उत्पादक फॉक्सकॉनचा समावेश आहे.
शिओमीने अखेर मोबाईल विक्री थांबविली
तंत्रज्ञान विषयक पेटंटच्या दुरुपयाबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाचे र्निबध आलेल्या चीनच्या शिओमीने भारतातील मोबाईल विक्री थांबवित असल्याचे अखेर घोषित केले आहे. तंत्रज्ञान विषयक पेटंटच्या एरिक्सनच्या दाव्याविरुद्ध शिओमीला न्यायालयीन प्रक्रियेत हार पत्करावी लागली आहे. परिणामस्वरुप कंपनी तिच्या रेडमी नोट आणि रेडमी १एस मोबाईलची विक्री थांबवित असल्याचे घोषित करण्यात आले आहे. इ-कॉमर्सवरील व्यासपीठावरून कंपनीच्या १.५० लाख मोबाईलसाठी नोंदणी दोन दिवसात झाल्याचेही कंपनीने म्हटले आहे. कंपनीला येत्या फेब्रुवारीपर्यंत भारतात मोबाईलची विक्री करता येणार नाही.
फॉक्सकॉनचा व्यवसाय २४ डिसेंबरपासून ठप्प
तैवानस्थित फॉक्सकॉन या मोबाईलचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपनीने तिच्या चेन्नई येथील प्रकल्पातील उत्पादन येत्या २४ डिसेंबरपासून थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कंपनीच्या ग्राहकांच्या निर्मिती धोरणात झालेल्या बदलामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामुळे १,७०० रोजगारांवर विपरित परिणाम होणार असून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाबरोबर चर्चा सुरू असून ग्राहकांची गरज जशी बदलेल तसे पुन्हा नव्याने गुंतवणुकीचा विचार होऊ शकतो, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
अनेकांचे गुंतवणूक विस्ताराचे मनसुबे कायम
‘मेक इन इंडिया’ला भारतीय विद्युत उपकरण निर्मिती उद्योगाकडून प्रोत्साहन दिले जात असतानाच आयकिया या युरोपातील तयार फर्निचर निर्मितीतील आघाडीच्या विदेशी कंपनीने भारतासाठी २०२० पर्यंत दुप्पट उत्पादन आणण्याचे धोरण जाहिर केले आहे.
देशातील विद्युत उपकरण निर्मिती उद्योगाची वाढ २०१७ पर्यंत १२५ अब्ज डॉलपर्यंत जाईल, असा विश्वास या क्षेत्रातील उत्पादकांच्या संघटनेने व्यक्त केला आहे. ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’चे मावळते अध्यक्ष अनिरुद्ध धूत यांनी याबाबत म्हटले आहे की, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला स्थानिक कंपन्यांकडून पाठिंबा मिळत असून हे क्षेत्र येत्या दोन ते तीन वर्षांत ४० टक्क्य़ांनी वाढले.
देशात किरकोळ दालन साखळीसाठी थेट विदेशी गुंतवणूक विस्तारल्यानंतर सर्वप्रथम प्रतिसाद देणाऱ्या आयकिया कंपनीने भारतासाठी येत्या पाच वर्षांत ३१.५ कोटी युरोचे उत्पादन, वस्तू आणण्याचे घोषित केले आहे.