आलिशान मोटारी निर्मितीसाठी नावाजलेले नाव असलेल्या फोक्सव्ॉगन या मूळच्या जर्मन कार कंपनीनेही आता भारतीय वाहन पुर्नखरेदी बाजारात शिरकाव केला आहे. कंपनीच्या ‘दास वेल्ट ऑटो’ या दालनात विविध कंपन्यांच्या जुन्या गाडय़ा उपलब्ध असतील. कंपनीचे प्रवासी कार विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद सक्सेना यांनी मुंबईतील या दालनाचे मंगळवारी उद्घाटन केले. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी नवा व्यवसाय २५ टक्के हिस्सा राखेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. १५ विक्री केंद्रासह कंपनीने या व्यवसायास सुरुवात केली असून २०१२ अखेपर्यंत आणखी ६ दालने सुरू केली जातील, अशी माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली.
जानेवारी २०१२ मध्ये नवी दिल्ली येथे भरलेल्या ऑटो शोमध्येच कंपनीने या क्षेत्रात उतरण्याचा मानस जाहीर केला होता. पोलो, व्हेन्टो, जेट्टा, पॅसट, टॉरेग आणि फॅटनसारखी जुनी वाहने भारतात विकणाऱ्या फोक्सव्ॉगनची वाहनेही या दालनांमध्ये असतील.    
*भारतीय वाहन पुर्नखरेदी-विक्री (प्रि-ओन्ड अथवा युजडय़ कार) बाजारपेठ सध्या ६०,००० कोटी रुपयांची असून त्यात तूर्त महिंद्राच्या ‘फर्स्ट चॉईस’ची *मक्तेदारी आहे.
* मारुती सुझुकीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतर जगदीश खट्टर हेही ‘कार नेशन’मार्फत या व्यवसायात उतरले होते. स्वत: मारुतीही २००० च्या सुमारास या क्षेत्रात आपल्या ‘ट्रू व्हॅल्यू’ दालनांद्वारे या व्यवसायात उतरली होती.
*देशातील वाहन पुर्नखरेदी-विक्री व्यवसाय हा वार्षिक १२ ते १४ टक्क्याने वाढत असून येत्या पाच वर्षांत तो १८ टक्क्यांपर्यंत जाईल, असा आशावाद या क्षेत्राकडून व्यक्त करण्यात येतो.