देशातील म्युच्युअल फंड उद्योगावर करोनाच्या रूपात नवे संकट ओढवले आहे. फ्रॅँकलिन टेम्पल्टन इंडिया म्युच्युअल फंडाने तिच्या ६ रोखे फंड योजना स्थगित करत असल्याचे शुक्रवारी जाहीर करत गुंतवणूकदारांना धक्का दिला. या योजनांद्वारे २५,००० कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन होते.
रोकड टंचाईपोटी कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे संबंधित फंड योजनेच्या गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, फंड दलालांनी याप्रकरणी सेबी तसेच अर्थ खात्याच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
फ्रॅँकलिन टेम्पल्टन या आघाडीच्या फंड घराण्याने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, फंड घराणे फ्रॅँकलिन इंडिया अल्ट्रा शॉर्ट बॉन्ड, फ्रॅँकलिन इंडिया शॉर्ट टर्म इन्कम, फ्रॅँकलिन इंडिया डायनॅमिक अॅक्र्युअल, फ्रॅँकलिन इंडिया क्रेडिट रिस्क, फ्रॅँकलिन इंडिया लो डय़ुरेशन फंड आणि फ्रॅँकलिन इंडिया इन्कम ऑपोच्र्युनिटीज फंड या सहा फंड योजना आहेत.
या योजना २४ एप्रिलपासून नव्या गुंतवणुकीस बंद केल्या आहेत.
कारण काय घडले?
जागतिक अर्थव्यवस्थेवरील कोरोना विषाणूचा सर्वत्र उद्रेक झाल्यानंतर रोखे बाजारातील रोकड सुलभता कमालीची खालावली. पुरेशा रोकड सुलभतेअभावी रोखे बाजारात कंपन्यांच्या रोख्यांच्या भावात सतत घसरण झाली होती. रोखे बाजार हा वित्त वर्ष अखेरिस नेहमीच रोकड चणचणीचा सामना करतो. फ्रॅँकलिन फंडासहित अन्य फंड घराण्यांच्या रोखे फंडातून गुंतवणूकदार पैसे काढून घेत होते. ज्यांच्या मालमत्तेत उच्च पत असणारे रोखे होते त्या फंड घराण्यांना रोकड सुलभता आटण्याचा कमी सामना करावा लागला. याचा सर्वाधिक फटका फ्रॅँकलिन टेम्पल्टन इंडियासारख्या कमी पत असलेल्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फंडांना बसला. गेल्या दोन महिन्यांपासून रोकड सुलभतेवर मात करण्यासाठी सेबीने मान्य केलेल्या मर्यादेत फंड घराण्याने कर्ज उचलसुद्धा केली होती. त्यातच गुंतवणूकदारांनी फंडातून पैसे काढून घेण्याचा ओघ सुरूच राहिला. घेतलेल्या कर्जावर द्यावे लागणाऱ्या व्याजाच्या खर्चामुळे फंडाच्या मालमत्ता मूल्यात सातत्याने घसरण होत होती. त्यामुळे फंड स्थगित करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय फंड घराण्यापुढे नव्हता.
भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाने या प्रकारच्या अनेक आवर्तनांचा सामना केला आहे. रोखे गुंतवणूककरणाऱ्या निधी व्यवस्थापकांनी अशा समस्यांवर मात केली आहे. भारतीय गुंतवणूकदारांनी फंड उद्योगावर नेहमीच विश्वास प्रदर्शित केला असून फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता गेल्या पाच वर्षांत दुप्पट झाली आहे. रोखे फंडांनी उच्च प्रतीच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.
– एन. एस. व्यंकटेश, मुख्य कार्यकारी अधिकारी, अॅम्फी (फंड उद्योग संघटना).