ज्याच्या लेखी फ्रान्सबद्दल काडीचाही आदरभाव नाही, त्या पोलादसम्राट म्हणून लौकीक असलेल्या लक्ष्मी मित्तल आणि त्यांच्या आर्सेलोर-मित्तल या उद्योगसमूहाच्या प्रकल्पांचीही फ्रान्सला अजिबात गरज नाही, असे रोखठोक प्रतिपादन फ्रान्सच्या नवनिर्वाचित समाजवादी सरकारचे उद्योगमंत्री अरनॉड माँटेबर्ग यांनी सोमवारी केले. मित्तल यांच्या उद्योगसमूहाच्या फ्रान्समधील प्रकल्पांचा ताबा घेईल अशा नवीन भागीदारांचा तात्पुरता शोधही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फ्रेंच भूमीबद्दल आदर नसलेल्या मित्तल यांचीही फ्रान्सला यापुढे गरज नाही, असे माँटेबर्ग यांनी एका फ्रेंच वित्तीय दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. लक्ष्मी मित्तल हे २००६ पासून सतत खोटारडी विधाने करीत असून, फ्रान्सबद्दल त्यांनी कधीही प्रामाणिक बांधिलकी दाखविली नसल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. आर्सेलोर-मित्तल समूहाच्या त्या देशातील विविध प्रकल्पात २०,००० लोकांना रोजगार पुरविला जात आहे. फ्रान्सच्या पूर्वेकडील फ्लॉरेन्ज प्रांतातील एका प्रकल्पातील लोहभट्टी विभाग आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य नसल्याने बंद करण्याच्या मित्तल यांचा प्रस्ताव फ्रेंच सरकारने अडवून धरला आहे. केवळ लोहभट्टी नव्हे तर तो संपूर्ण प्रकल्पच मित्तल यांनी विक्रीस काढावा असा फ्रेंच सरकारचा आग्रह आहे. यावरून उभयतांमध्ये गेल्या महिन्या-दोन महिन्यांपासून शाब्दिक हेवेदावे सुरू झाले आहेत.
१ ऑक्टोबर रोजी आर्सेलोर-मित्तल समूहाने हा लोहभट्टी विभाग बंद करीत असल्याचे जाहीर करताना सुयोग्य खरेदीदार फ्रेंच सरकारने दोन महिन्यांच्या मुदतीत शोधून काढावा, असा निर्वाणीचा इशारा देऊन या तणावाला आणखीच खतपाणी घातले. हा संपूर्ण प्रकल्प विक्रीस काढण्याला मित्तल यांचा विरोध असून, त्यावर गेल्या आठवडय़ात उद्योगमंत्री माँटेबर्ग यांनी या प्रकल्पाचे हंगामी स्वरूपात राष्ट्रीयीकरण करण्याबाबत फ्रेंच लोकप्रतिनिधींपुढे प्रस्ताव मांडला. फ्लॉरेन्ज प्रकल्पाबाबत फ्रेंच सरकारच्या या पवित्र्यातून त्या देशातील अन्य उत्पादन प्रकल्पांबाबत आपल्याला फेरविचार करावा लागेल, असा मित्तल यांनी अलीकडेच इशारा दिला आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा