निवडक सार्वजनिक उपक्रमांतून ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड)च्या माध्यमातून ३,००० कोटी रुपये उभारणीचा सरकारचा प्रयत्न सध्याच्या भांडवली बाजाराच्या तेजीमध्ये छोटय़ा गुंतवणूकदारांनाही एक चांगली संधी निर्माण करून देत आहे. सरकारी मालकीच्या आघाडीच्या १० कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांना या माध्यमातून कमी मूल्यांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. मुख्य गुंतवणूकदारांना हा पर्याय मंगळवारपासूनच उपलब्ध झाला.
शेअर निर्देशांक ऐतिहासिक टप्प्यानजीक असताना सीपीएसई ईटीएफद्वारे सार्वजनिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया बुधवार ते शुक्रवार २१ मार्चपर्यंत खुली असेल. अर्ज करताना किरकोळ गुंतवणूकदारांना पाच टक्के सवलत मिळणार आहे. तर एक वर्षांपेक्षा अधिक काळासाठी गुंतवणुकीत राहिल्यास ६.६६ टक्के बोनस लाभ (प्रत्येक १५ युनिटमागे एक अतिरिकक्त युनिट बक्षीस रूपात) मिळेल. प्रारंभिक विक्रीपश्चात ११ एप्रिल २०१४ रोजी हा फंड नियमित खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी सुरू होईल.
किरकोळ गुंतवणूकदार या फंडामध्ये किमान ५,००० रुपये व त्यापुढे एक रुपयाच्या पटीत कमाल २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. गोल्डमॅन सॅक्स या फंडाचे व्यवस्थापन पाहत असून या नव्या निर्देशांकाद्वारे सरकार भविष्यातील निर्गुतवणूक धोरण राबवील. ही योजना यशस्वी झाल्यास सरकारचेही चालू आर्थिक वर्षांचे १६ हजार कोटी रुपयांचे निर्गुतवणूक उद्दिष्ट सफल होऊ शकते. ३,००० कोटी रुपये उभारणीच्या सरकारच्या या प्रयत्नात १० सार्वजनिक कंपन्यांमध्ये महारत्न, नवरत्न व मिनीरत्न दर्जाच्या कंपन्या आहेत. ईटीएफच्या स्वरूपातच या योजनेची नोंद भांडवली बाजारात होईल. अधिक लाभांश देणाऱ्या या कंपन्यांचा ताळेबंदही फायद्यातील असल्याची नोंद विश्लेषकांच्या दफ्तरी आहे. देशाच्या तेल व ऊर्जा क्षेत्रात या माध्यमातून गुंतवणुकीची अनोखी संधी असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सरकारी मालकीच्या कंपन्यांमध्ये ईटीएफच्या माध्यमातून गुंतवणूक करून सेन्सेक्स व निफ्टीच्या तुलनेत येत्या दोन ते तीन वर्षांत याद्वारे अधिक परतावा मिळू शकतो, असाही त्यांचा दावा आहे.
सरकारची ‘ईटीएफ’द्वारे निधी उभारणी
निवडक सार्वजनिक उपक्रमांतून ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड)च्या माध्यमातून ३,००० कोटी रुपये उभारणीचा सरकारचा प्रयत्न सध्याच्या भांडवली बाजाराच्या तेजीमध्ये छोटय़ा गुंतवणूकदारांनाही एक चांगली संधी निर्माण करून देत आहे.
First published on: 19-03-2014 at 01:11 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fundraising through exchange traded fund